ऐतिहासिक महत्त्व असलेला शिरूर तालुका

शिरूर तालुक्याचा नकाशा पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

राज्याच्या पुणे जिल्ह्यातील शिरूर हे एक ऐतिहासिक शहर आणि तालुका. घोड नदीच्या किना-यावरील हे शहर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर वसले आहे. घोड नदीच्या सान्निध्यामुळे हे शहर घोडनदी या नावानेही ओळखले जाते. शहराच्या नियोजनासाठी नगरपालिका आहे.

शिरूरला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहिले असता, हा तालुका अहमदनगर राज्य मार्गावरील नैऋत्येकडील २४ किलोमीटरवरील भीमा नदीपासून सुरू होतो आणि त्याच मार्गावर ५० किलोमीटरवरील घोड नदीच्या तीरावर संपतो. शिरूर परिसराचे भौगोलिक अवलोकन केल्यास, अनेक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणा दिसून येतात. मराठेशाहीत सन १८१८ मध्ये कोरेगाव-भीमा येथे मराठ्यांची ब्रिटिशांबरोबर मोठी लढाई झाली होती. हिंदूपदपातशाहीचे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक असलेले वढू बुद्रुक, पेशवाईमध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी मस्तानी हिला इनाम दिलेले केंदूर, पाबळ येथील मस्तानी महाल, संतोबा यांचे कान्हूर, भूगर्भ वैज्ञानिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे इनामगाव, छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनानी नेताजी पालकर यांचे वास्तव्य असलेले तांदळी, रांजणगाव येथील महागणपती ही त्यापैकी काही ठळक गावे.

अलिकडील काळात शिरूर तालुका शैक्षणिक आणि औद्योगिकदृष्ट्या भरभराटीस आलेला तालुका म्हणून गणला जातो. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि शिरूर तालुक्यातील गावांसाठी ही औद्योगिक वाढ विकासाच्या वाटेने नेणारी ठरली आहेत.

समाज
शिरूर तालुक्यात विविध समाज आणि धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. लोकसंख्येने हिंदू सर्वाधिक असून, त्यात मराठा, धनगर, सोनार, विणकर, कुंभार आदी समाजाचे लोक आहेत. व्यवसायानुसार विविध समाजाच्या लोकांच्या स्वतंत्र वसाहती आहेत. अन्य समाज आणि धर्मियांमध्ये मुस्लिम, जैन (प्रामुख्याने श्वेतांबर पंथाचे मारवाडी) आणि तुरळक ख्रिस्ती यांचा समावेश आहे. मारवाडी समाजाचे नागरिक ब्रिटिश राजवटीत १९ व्या शतकात येथे स्थलांतरित झाले आहेत. शिरूरमध्ये काही वर्षांपूर्वीपर्यंत घोड्यांचे तबेले होते. ब्रिटिश लष्कराच्या ताफ्यातील या घोड्यांच्या तबेल्यांमध्ये अनेक मुस्लिम लोक मोतद्दार आणि अन्य कामे करत असत. अशाच तबेल्यांपैकी एक महाराष्ट्र सरकारने पाटबंधारे खात्यातील कर्मचा-यांच्या वसाहतीसाठी ताब्यात घेतला आहे.

हवामान
उष्ण तापमान आणि तुरळक पावसामुळे शिरूर तालुक्यातील जमीन गहू आणि ऊस लागवडीसाठी योग्य आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी संत्री, कांदा, ज्वारी, बाजरी आणि लिंबाचेही उत्पन्न घेतात.

शिक्षण
शिरूर शहर आणि तालुक्यात मराठी माध्यमाच्या अनेक शाळा आहेत. नगरपालिकेच्याही काही मराठी शाळा आहेत. त्याशिवाय विद्याधाम प्रशाला आणि रयत शिक्षण संस्था यासारख्या नामवंत शिक्षण संस्थांच्याही शाळा आहेत. या पैकी बहुतेक शाळांमधून बारावीपर्यंतचे शिक्षण देण्यात येते. शिरूरमध्ये मुस्लिम धर्मियांची संख्या मोठी असल्याने, एक उर्दू शाळाही आहे. त्याशिवाय काही इंग्रजी माध्यमाच्या शाळाही आहेत. रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे रसिकलाल धारीवाल स्कूल आणि जीवन शिक्षण मंदीर या त्यापैकी काही शाळा. उच्च शिक्षणासाठी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मुंबई-पुण्याला जावे लागू नये, यासाठी महाविद्यालयेही सुरू करण्यात आली आहेत. एमडीआयएमआरटी संस्थेची उपसंस्था असलेले सी. टी. बोरा कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स या महाविद्यालयात बीसीएस आणि एमसीएस यासारख्या पदवी मिळविता येऊ शकतात. छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेने त्यांच्या सीताबाई थिटे महाविद्यालयामार्फत बीएड आणि बीफार्म या सारखे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत.

उद्योग
महाराष्ट्र सरकारने शिरूर तालुक्याला औद्योगिक परिसर म्हणून घोषित केल्यानंतर, १९९४ च्या सुमारास येथील औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. कोरेगाव, ढोक सांगवी आणि रांजणगाव ही गावे औद्योगिकदृष्ट्या पुढारलेली आहेत. हा परिसर रांजणगाव-कोरेगाव एमआयडीसी या नावाने ओळखला जातो. वाहनांचे टायर्स बनविणारी अपोलो टायर्स, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन यासारखी गृहोपयोगी उपकरणांचे उत्पादन करणारी व्हर्लपूल इंडिया, दूरचित्रवाणी संच, मोबाईल, रेफ्रिजरेटर आदी अनेक विद्युत आणि इलेक्टॉनिक उपकरणांच्या निर्मितीत अग्रेसर असलेली दक्षिण कोरियातील एलजी इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आणि दक्षिण कोरियाचीच डेवू इलेक्ट्रॉनिक्स, व्हील्स इंडिया, बजाज इलेक्ट्रिकल्स, लेज सारख्या खाद्यपदार्थांच्या निर्मितीत असलेली पेप्सिको होल्डिंग्ज, फियाट ऑटोमोबाईल्स, किर्लोस्कर, स्वरोवस्की आणि इलेक्ट्रॉनिक सुटे भाग बनविणारी दक्षिण कोरियाची ओहसुंग यासारख्या अनेक मोठ्या कंपन्या या पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात आहेत.

  • 1