पिंपळे जगताप - माझे भाऊ (वडील)...

Image may contain: one or more people and hat
शिरूर तालुक्यातील पिंपळे धुमाळ गावचे सुपूत्र व पोलिस अधिकारी रमेश धुमाळ यांनी वडिलांवर लिहिलेला लेख सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक पालिस अधिकाऱयाने वडिलांवर लिहिलेला लेख जरूर वाचा त्यांच्याच शब्दांत...

भाऊ म्हणून सर्वांना परिचित असणारे, नाव मल्हारी असले तरी स्वभाव मात्र भोळया शंकरासारखा असणारे, दोन पाय आणि एक हात मोडलेला असताना, पाठीला जबर धक्का बसलेला असताना सुद्धा अपार कष्टातून मला घडवणारे माझे वडील, माझे भाऊ.

Image may contain: 1 person
मुलाच्या खूर्चीवर बसण्याचं समाधान काही औरच !!

सर्वांचीच परिस्थिती ७०-८० च्या दशकात हलाखीची होती. तशीच ती आमचीही होती. भाऊंनी अनेकदा मरणाला हुलकावणी दिल्याचे ते मला सांगतात. १९६६ साली भाऊ पहलीत असताना एका मुलाने मागून धक्का दिल्याने त्यांचा उजवा हात मनगटात मोडला होता. भाऊंना आठवीला शिक्रापूरला शाळेला जावे लागे. एके दिवशी शिक्रापूरमध्ये रस्ता ओलांडताना एसटी ने भाऊंना उडवले. भाऊंचा उजवा पाय मोडला होता. १९८०-१९८१ च्या सुमारास भाऊंना टायफाईड हा आजार झाला होता. हाडावर फक्त कातडी शिल्लक होती. तेव्हा मरणाच्या दारातून परत आल्याचे भाऊ सांगतात. वाबळे वस्ती वरील डाळ मिल चे काम चालू असताना पहिला मजला कोसळला. भाऊ पहिल्या मजल्यावर होते. भाऊंसह बाकीचं कामगार ढिगाऱ्याखाली सापडले. भाऊंच्या पाठीला जबर मार लागला. भाऊंनी त्या ढिगाऱ्यामधून बाहेर येऊन बाकीच्या २-३ कामगारांना बाहेर काढले होते. मी सातवीला असताना भाऊ नाथाभाऊंच्या विहिरीत पडले होते. ७ परस अगदीच थोडे पाणी असलेल्या विहिरीत पडणे म्हणजे वाचने अश्यक्य. परंतु फक्त डाव्या हातावर निभावले. राजनीला जाऊन हात बसवला. आणि ३-४ महिन्यांनी भाऊंचे काम पुन्हा सुरु. अशारितीने सर्व शरीर खिळखीळे झालेले असताना त्यांनी केलेल्या कष्टाला तोड नाही.

Image may contain: 4 people
समाधानाचे हास्य !!

माझ्या लहानपणीचा विषय निघाला की आई सांगते की, मी लहान असताना एकदाच भाऊंनी मला मारले होते तेव्हा मी आजारी पडलो होतो. त्यानंतर मात्र भाऊंनी मला कधीच हात लावला नाही कि रागावले नाही.

सुरवातिला २ शेळ्या आमच्याकडे होत्या. त्याच्यावर कशीबशी गुजराण चालू होती. पोपट तात्यांच्या सोबत विहिरी फोडण्याच कामही त्यांनी खूप दिवस केले. त्यानंतर दोन जर्सी गाया घेऊन दूध व्यवसाय चालू केला. गवताचे मोठमोठे भारे डोक्यावर घेतलेले भाऊ आणि आई असे चित्र अजूनही माझ्या डोळ्यासमोर उभं राहत. विहिरी फोडण्याचं काम चालूच होते. गावडे मामा, तुका तात्या यांच्या बोरिंग मशीन वर सकाळीच जाऊन बोर घ्यायचे आणि दिवसभर त्याच विहिरीत इतर गड्यांसोबत काम करायचं असा नित्यक्रम असायचा. एका होल चे त्यावेळी २ रुपये मिळायचे. दिवसभराचा किती रोज पडला याच गणित कधीकधी मी करायचो. आज किती २४ होल. म्हणजे २४X२=४८ आणि दिवसाचा रोज १०० असे १४८. मला वाटत गणित मी अस शिकलो. ज्वारी काढताना मी त्याना पाहिलंय. पुर्वी सावडी असायच्या. भाऊ स्वतःच्या वाट्याची ज्वारी काढून आईचीही बाजू ओढून घायचे. संध्याकाळी हातांच्या चिरांमध्ये बिब्बा लावण्याचे काम कधी कधी मी केले आहे. पका तात्यांप्रमाणे आम्हीही धान्याची मशीन घेतली. त्यावरही स्पर्धा असल्यासारखे कष्ट भाऊंनी केले.

मी पुण्याला अभ्यासाला असताना त्यांची तारेवरची कसरत असायची. दोन गायांच्या आणि २.५ -3 एकराच्या तुकड्यावर त्यांनी मला शिकवले. मी अधिकारी होईल असं भाऊ, आई अन मी सोडून कदाचित कोणालाही वाटत नसावं. तो काळही तसाच होता.

आज गावातील लोक जेव्हा म्हणतात की, तुझ्या आई-वडीलांनी खूप कष्ट केले. त्यांच्या कष्टाची पुण्याई मुळे तू अधिकारी झाला. डोळे आपसूकच पान्हावतात. मला अभिमान वाटतो माझ्या भाऊंचा आणि आईचा. शून्यातून जग त्यांनी निर्माण केलंय. २०१४ मध्ये साधी दुचाकी गाडीही चालवता न येणारे भाऊ आज इनोव्हा गाडीतून फिरवताना पाहिले की वेगळेच समाधान वाटते. त्यांनी केलेल्या कष्टाचे आणि गाळलेल्या प्रत्येक घामाच्या थेंबाचे ऋण त्यांना सुखात ठेवून व्यक्त करण्याचा माझा प्रयत्न आहे.

Image may contain: 1 person, indoor
स्वप्नातही कदाचित न पाहिलेला विमान प्रवास !!

प्रत्येकासाठी त्याचे वडील हे हिरो असतात. तुम्हीही तुमच्या वडिलांबद्दलच्या आठवणी, भावना शब्दात व्यक्त करून पाठवू शकता. त्या शब्दबध्द केलेल्या आठवणी वडिलांनी वाचल्या किंवा त्यांना त्या समजल्या कि त्यांना होणारा आनंद अवर्णनीय असेल...

Comment Box is loading comments...

संबंधित लेख