करडे दरोड्यातील जखमी बांदल यांचे निधन; रास्ता रोको

करडे, ता. 13 डिसेंबर 2015 (तेजस फडके)- येथील दाऊल मालक परिसरात पडलेल्या दरोड्यातील जखमी मच्छिंद्र बांदल यांचे उपचारा दरम्यान शनिवारी (ता. १२) पहाटे खाजगी दवाखान्यात निधन झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सुमारे एक तास शिरुर-चौफुला मार्गावर रस्तारोको करत तीव्र संताप व्यक्त केला. दरोडयातील आरोपीना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली.

५ डिसेम्बर रोजी पहाटे मछिंद्र बांदल यांच्या घरावर सशस्र चोरटयानी हल्ला करुन मछिंद्र बांदल यांच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शनिवारी पहाटे त्यांचे निधन झाले. घटना होऊन आठ दिवस उलटूनही पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यास अपयश आले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी १०च्या दरम्यान शिरुर-चौफुला महामार्ग सुमारे १ तास रोखून धरत आपला संताप व्यक्त केला.

यावेळी शिरुर पंचायत समितीच्या उपसभापती, करडे गावच्या सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच राजेंद्र जगदाळे पाटील, संतोष लंघे, ग्रामपंचायत सदस्य विशाल घायतडक, राजेंद्र गायकवाड व ग्रामस्थांच्या वतीने शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना निवेदन देऊन आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी केली.

मछिंद्र बांदल हे स्वभावाने अतिशय शांत व मनमिळावू होते. त्यामुळे त्यांच्या अशा आकस्मिक जाण्याने संपूर् गावात हळहळ व्यक्त होत आहे. गावात परत चोरी करताना एखादा चोर ग्रामस्थांच्या हातात सापडला तर त्याला आम्ही जिवंत सोडणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया गावातील युवकांनी www.shirurtaluka.comशी बोलताना दिली.
करड्यात दरोडेखोरांच्या मारहाणीत चौघे गंभीर जखमी
करडे,
ता. 6 डिसेंबर 2015-
येथील दावल मलिक वस्तीतील मच्छिंद्र रामभाऊ बांदल (वय 45) यांच्या घरावर पाच ते सहा दरोडेखोरांनी शुक्रवारी मध्यरात्री दरोडा टाकला. दरोडेखोरांच्या मारहाणीत चौघे गंभीर जखमी झाले असून, दोघांवर पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व इतर चीजवस्तू चोरून नेल्या आहेत.

मच्छिंद्र बांदल व त्यांच्या पत्नी शारदा (वय 40) मुलगा दीपक (वय 24) व नवनाथ (वय 19) ही गंभीर जखमी झाली आहेत. शारदा यांच्यावर शिरूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोयत्याचा घाव मच्छिंद्र बांदल यांच्या वर्मी बसला असून, नवनाथ यांच्या छातीजवळ सुऱ्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. या दोघांना पुण्यातील रुग्णालयात दाखल केले आहे. शारदा बांदल यांच्या तक्रारीवरून दरोडेखोरांविरुद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
दावल मलिक वस्तीवर दोन खोल्यांच्या घरात मच्छिंद्र बांदल हे पत्नी शारदा, मुलगा दीपक, सून शीतल व दुसरा मुलगा नवनाथ असे एकत्र राहत आहेत. दीपक हा खासगी कंपनीत कामाला आहे. तो रात्री साडेअकराच्या सुमारास घरी आला. तत्पूर्वी साडेदहापर्यंत सर्व कुटुंबीय झोपी गेले होते. एकच्या सुमारास दरोडेखोरांनी मोठा दगड टाकून घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तत्पूर्वी, दीपक व शीतल झोपलेल्या खोलीला त्यांनी बाहेरून कडी लावली. मोठा आवाज झाल्याने बांदल कुटुंबीय जागे झाले. दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत, "कुणाकडे काय आहे ते काढून द्या, नाहीतर एकेकाचे मुडदे पाडू' असा दम दिला. प्रथम मच्छिंद्र यांच्या डोक्‍यात कोयत्याचे घाव घातले. त्यांना वाचविण्यासाठी नवनाथ पुढे आला असता, त्याच्या छाती, हात व पोटावर चाकूने वार केले. त्यामुळे बांदल कुटुंब भेदरून गेले. सुऱ्याचा धाक दाखवीत, घरातील कपाट उघडून त्यातील मंगळसूत्र, कर्णफुले असे 11 तोळ्यांचे दागिने त्यांनी हस्तगत केले. शारदा यांच्या कानातील डुलाची मागणी केली असता, त्यांनी एक डूल काढून दिले. दुसरे काढत असताना एका दरोडेखोराने ते ओरबाडून घेतल्याने त्यांच्या कानाची पाळी तुटली.

दीपक व शीतल झोपलेल्या खोलीकडे दरोडेखोरांनी त्यानंतर मोर्चा वळविला. या खोलीचे लाकडी पार्टिशन लाथा मारून तोडले. दीपक यांनी प्रतिकार करताच लाकडी दांडके व कोयत्याने त्यांना मारहाण केली. शीतल यांच्या पायातील पैंजण आणि जोडवे काढून घेतले. बाहेर पडताना दरोडेखोरांनी शीतल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहिले व त्याचीही मागणी केली. त्यांनी खिडकीतून ते काढून दिले. सुमारे एक लाख 87 हजार सातशे रुपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोरांनी नेले.
जखमी बांदल कुटुंबीयांनी आसपासच्या लोकांना मोबाईलवर संपर्क साधला; तसेच शीतल यांनीही जवळच राहणाऱ्या चुलत्यांना मोबाईलवरून माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी बांदल यांच्या घराकडे धाव घेतली. वीस ते पंचवीस वयोगटांतील दरोडेखोरांनी पॅंट, टी. शर्ट व शर्ट घातले होते. ते मराठीत बोलत होते, अशी माहिती बांदल कुटुंबीयांनी दिली.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच शिरूरचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर, फौजदार मनोज नवसरे, न्हावरे दूरक्षेत्राचे सहायक फौजदार एस. डी. येळे, अमित चव्हाण, प्रशांत म्हस्के आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मोरे यांनीही पहाटे घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. परिसराची नाकेबंदी केली असून, दरोडेखोरांच्या मागावर पोलिस पथके रवाना केल्याचे मोरे यांनी सांगितले. सकाळी श्‍वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते. संशयित वस्तू नसल्याने श्‍वान घराजवळच घुटमळले; तर काही वस्तूंवरून चार ठसे मिळाल्याचे ठसेतज्ज्ञ परवीन शेख यांनी सांगितले.

बांदल कुटुंबीयांवर हल्ला करणारे हल्लेखोर ओळखीचे असावेत, अशी कुजबूज घटनास्थळी सुरू होती. जखमी नवनाथ बांदल हे शिरूरमधील ऍकॅडमीमध्ये पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत असून, दरोडेखोरांनी घरात प्रवेश करताच नवनाथ याच्याकडे रोख वळवत "हाच ऍकॅडमी करतो का?' अशी विचारणा केली. शारदा बांदल यांनी फिर्यादीत तसे नमूद केले आहे. "जे जवळ आहे, ते काढून द्या. आरडाओरडा केला, तर मुडदे पाडू. नाहीतरी तुम्हाला खल्लास करण्याची सुपारी आम्हाला मिळालेली आहे', असे दरोडेखोर म्हणाल्याचेही बांदल यांच्या जबाबात म्हटले आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या