करडे दरोड्यातील आरोपींना अटक करा; अन्यथा...

करडे, ता. 10 जानेवारी 2016 (तेजस फडके)- येथील बांदलमळ्यातील दरोडयाला एक महीना उलटला असून, अद्यापही आरोपींचा तपास लागलेला नाही. येत्या आठ दिवसात आरोपींना अटक न केल्यास न्हावरे फाटा येथे पुणे-अहमदनगर महामार्गावर रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा करडे ग्रामस्थांनी दिला.

येथील बांदलमळ्यातील दरोडयात मृत्युमुखी पडलेले मछिंद्र रामभाऊ बांदल यांच्या कुटुंबीयांची घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी भेट घेऊन कारखान्याच्या वतीने शारदा बांदल यांना ५० हजार रुपयाची मदत दिली.

मछिंद्र बांदल यांच्या घरी ५ डिसेंबर रोजी दरोडा पडला होता. त्यात मछिंद्र बांदल पत्नी शारदा व त्यांचा मुलगा नवनाथ हे तिघेही गंभीर जखमी झाले होते. उपचारा दरम्यान मछिंद्र बांदल यांचा १२ डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. या दोन्ही पिता पुत्रांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात तर पत्नीला शिरुर येथे  उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी उपचारांसाठी सुमारे ७ लाख खर्च आला होता. तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पाबळ दरोडयातील जखमीना शासकीय कोट्यातून मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, येथील बांदल कुटुंबाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप बांदल कुटुंब व ग्रामस्थांनी केला आहे. पाबळ येथील आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. परंतु, करडे दरोडा प्रकरणातील एकही आरोपी पोलिसांना अद्याप सापडला नसल्याने बांदल कुटुंबीयांनी पोलिसांच्या भूमिकेविषयी शंका व्यक्त केली आहे. याबाबत शिरुरचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना विचारले असता त्यांनी तपास योग्य दिशेने चालू असल्याचे सांगितले. आरोपीच्या शोधासाठी पाच पथके नियुक्त केली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अशोक पवार, शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मानसिंग पाचुंदकर, राजेंद्र जासूद, रविंद्र काळे, संतोष दौंडकर, विशाल घायतडक, हिराबाई गायकवाड, सुधीर जगदाळे, अंकुश बांदल व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या