शिंदोडीच्या ग्रामस्थांचे धरणे आंदोलन; अात्मदहनाचा इशारा

शिंदोडी, ता.२ मार्च  २०१६ (तेजस फडके) : साईकृपा शुगर लिमिटेड युनिट २ (ता. श्रीगोंदा) या कारखान्याने सन २०१४-१५ गळीत हंगामाचे ऊसाचे पैसे अद्याप न दिल्याने येथील संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गुरुवारी (ता. ३) गावातील विठ्ठल मंदीरात कुटुंबासह धरणे आंदोलन, चक्री उपोषण व नंतर आत्मदहन करण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे .

या संबधी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, साखर आयुक्त, शिरुर पोलीस ठाणे तसेच  तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.

शिंदोडी येथील शेतकऱ्यांनी सन २०१४-१५ मध्ये श्रीगोंदा येथील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मालकीच्या साईकृपा शुगर अँन्ड अलाईड इंडस्ट्रीज हिरडगाव युनिट २ या साखर कारखान्याला गाळपासाठी ऊस दिला होता. एफआरपी प्रमाणे १४ दिवसात शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक असताना शेतकऱ्यांना वर्ष उलटूनही पैसे मिळाले नाहीत. शिंदोडी येथील शेतकऱ्यांनी वेळोवेळी बबनराव पाचपुते व विक्रमसिंह पाचपुते यांची काष्टी येथे त्यांच्या निवासस्थानी २५ ते ३० वेळा जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन ऊसाच्या बिला संदर्भात विचारणा केली. परंतु, शेतकऱ्यांना आश्वासनाशिवाय काहीच पदरी पडले नाही.

बँकेने कर्ज परतफेडीसाठी लावलेला तगादा, मुलांचं शिक्षण, मुलींची लग्न, शेतीच भांडवल या सर्व प्रकारामुळे शेतकरी मेटाकुटीला आले असून, शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेवटचा मार्ग म्हणुन आत्मदहनाचा मार्ग स्विकारला आहे.  ३ मार्च ते ८ मार्च धरणे आंदोलन, ९ मार्च ते १३ मार्च चक्री उपोषण आणि त्यानंतर कुटुंबासह सामुहिक आत्मदहन करण्यात येणार आहे, असे सुधीर कळमकर, बाळासो धावडे, संतोष टाकळकर, नामदेव दुर्गे, पांडुरंग फडके यांच्यासह सर्व पिडीत शेतकऱ्यांनी www.shirurtaluka.com शी बोलताना संगितले .
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या