पिंपळसुटी व वाघाळे येथील ग्रामस्थांचा अांदोलनाला पाठिंबा

शिंदोडी, ता. ४ मार्च  २०१६ (तेजस फडके) : येथील शेतकऱ्यांनी श्रीगोंदा येथील साईकृपा शुगर अँन्ड अलाईड इंडस्ट्रीज हिरडगाव युनिट २ या कारखान्याने ऊसाच्या गाळपाचे पैसे न दिल्याच्या निषेधार्थ गुरुवार (दि ३) पासून गावातील विठ्ठल मंदिरात सुरु केलेल्या धरणे आंदोलन व उपोषणास  शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. पिंपळसुटी व वाघाळे येथील ग्रामस्थांनी शिंदोडी येथे येऊन आंदोलनास पाठींबा दिला.

आंदोलन पुढील काही दिवसात आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. शिंदोडीच्या ग्रामस्थांनी छेडलेल्या आंदोलनास सोशल नेटवर्क वरुन  देखील  प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक शेतकरी आपला राग व्यक्त करत आहेत. गावातील सगळे शेतकरी, युवक, महिलावर्ग एकत्र आले आहेत. शेतात रात्रंदिवस कष्ट करुन पिकविलेल्या ऊसाचे  हक्काचे पैसे मिळाल्याशिवाय मंदिरातून उठणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या आंदोलनाकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे. दोन दिवस उलटूनही आंदोलनस्थळी शासकीय कर्मचारी फिरकला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

या आंदोलनात युवा कार्यकर्ते योगेश ओव्हाळ, संदीप फडके, बाळासो धावडे, पांडुरंग फडके, राजेंद्र खेडकर, दत्तात्रय फडके, ज्ञानदेव वाळुंज, सदाशिव धावडे यांचा सक्रिय सहभाग असून गावातील ग्रामस्थांचा त्यांना पाठींबा मिळत आहे.

बबनराव पाचपुते व विक्रम पाचपुते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या