शिंदोडीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित

शिंदोडी, ता. 12 मार्च 2016 (तेजस फडके)- ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हिरडगाव (ता. श्रीगोंदा) येथील साईकृपा साखर कारखान्याच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन शेतकरी व कारखाना व्यवस्थापन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर शुक्रवारी (ता. 11) स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती आंदोलनाचे नेतृत्व करणारे योगेश ओव्हाळ यांनी दिली.

शेतकऱ्यांनी विविध मार्गांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता. अखेर व्यवस्थापनाने तातडीने पाऊले उचलत शेतकऱ्यांशी चर्चेची तयारी दाखवली. यानुसार कारखान्याकडून 1596 रुपयांची पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे.

दरम्यान, केवळ 1596 रुपयांनी शेतकऱ्यांचे पेमेंट जमा केले म्हणजे कारखाना व्यवस्थापनाची जबाबदारी संपली असे नाही. उर्वरित रक्कम पुढील चर्चेत मान्य केली नाही, तर न्यायालयीन लढाई लढू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
बाजारभावाप्रमाणे पैसे मिळेपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार...
शिंदोडी, ता. ६ मार्च  २०१६ (तेजस फडके) :  सोशल मिडिया व इतर बातम्यांचा धसका घेत साईकृपा साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने शनिवारी उशीरा काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १५९६ रुपये प्रमाणे रोख रक्कम जमा केली अाहे. परंतु, जोपर्यंत शेतकऱ्यांना १८०० रुपये प्रमाणे पैसे मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे अांदोलनकर्त्यांनी सांगितले.

गेल्या चार दिवसांपासुन साईकृपा साखर कारखाना ने ऊसाच्या गाळपाचे पैसे न दिल्याने शेतकऱ्यांचे शिंदोडी येथे धरणे अांदोलन सुरु अाहे. रविवारी आंदोलनास चौथ्या दिवशी तालुका राष्ट्रवादीच्या वतीने श्री. काळे यांनी भेट देऊन पाठींबा व्यक्त केला. अांदोलन तीव्र करताच या कारखान्याने ठराविक रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा केली. परंतु, जानेवारी २०१५ मध्ये याच कारखान्याने इतर गावातील शेतकऱ्यांना १८०० रुपये बाजार भावाप्रमाणे पहिली उचल दिली होती. त्यामुळे बाजारभावाप्रमाणे जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत अांदोलन सुरुच ठेवणार असल्याचे अांदोलनकर्त्यांनी सांगितले.

निवडणुकीपुर्वी भाजपाचे नेते सत्तेत येण्यासाठी 'अच्छे दिन' येणार असे सांगत होते. परंतु, गेले वर्षभर भाजपाचेच नेते शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना 'बुरे दिन' आले आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळालेच पाहिजेत, यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत, असे श्री. काळे यांनी सांगितले.

सांगा पाचपुते साहेब काय करायच?...
शिंदोडी येथील काही शेतकऱ्यांना साईकृपाच्या व्यवस्थापनाने चेक दिले होते. ते चेक बाऊन्स झाले. परंतु, बँकेत रक्कम जमा करताना मात्र चेकची रक्कम वगळून व्यवस्थापनाने शेतकऱ्यांची बिले जमा केली गेली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून आमचेच हक्काचे पैसे असून आम्हाला वेळेवर मिळत नसल्याचे सांगितले.

यावेळी शिंदोडीचे इंद्रभान ओव्हाळ, नानाभाऊ फडके, बाळासो धावडे, दत्तात्रय फडके, कुरुळीचे नितीन थोरात, खेडचे भगवान चौधरी, निमोणेचे जालिंदर काळे, बी. व्ही. काळे, श्रीधर जगताप व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या