कवठे येमाईत युवकाचा आकस्मित मृत्यू

कवठे यमाई, ता. 8 मार्च 2016 (सुभाष शेटे)- येथील येमाई मंदिर चौकाजवळ मुंजाळवाडी येथील एका २२ वर्षे वयाच्या तरुणाचा आकस्मित मृत्यू झाला आहे. या बाबत तरुणाच्या वडिलांनी शिरूर पोलिसांत तक्रार दिली आहे.

या बाबत टाकळी हाजी पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरिक्षक एम एस नवसरे यांनी दिलेल्या माहिती नुसार, 'कवठे येमाईच्या मुंजाळवाडीत राहणारा हा २२ वर्षांचा तरुण अक्षय साहेबराव मुंजाळ रविवारी (ता. ६) सायंकाळी घरी चालला होता. येथील येमाई मंदिर चौकानजीक ताडीच्या दुकाना जवळ चक्कर येवून रस्त्याजवळ बेशुद्ध पडला. या बाबत गावातील लोकांनी झालेल्या प्रकाराबद्दल त्याचे वडील साहेबराव मुंजाळ यांना कल्पना दिली. ते तातडीने अक्षयला ग्रामस्थांच्या मदतीने स्थानिक दवाखान्यात घेवून गेले पण तेथून त्यांना शिरूर येथे जाण्यास सांगितले. त्यांनी शिरूरच्या माणिकचंद धारिवाल हॉस्पिटल मध्ये नेले असता तपासणी अंती तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.'

दरम्यान, पोलिस दप्तरी अक्षयच्या मृत्यूची नोंद आकस्मित मयत म्हणून करण्यात आली असून, त्याचा वैद्यकीय अहवाल हाती आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती शिरूर पोलिस ठाणे अमलदार राखुंडे यांनी दिली.

गावातील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या चौकानजीकच असणा-या ताडीच्या दुकानातील ताडी पिल्यामुळे अक्षयचा मृत्यू झाला असल्याची शंका आहे. गावात असणारे ताडीचे दुकान, अवैध दारू विक्री व इतर बेकायदा धंदे पोलिस प्रशासनाने तातडीने बंद करण्याची मागणी सरपंच, उपसरपंच, बबन बाळासो पोकळे, बाजीराव उघडे, रामदास रोहिले व अनेक संतप्त ग्रामस्थांनी निवेदन देत केली आहे.

गावातील ताडीचे दुकान व इतर हि अवैध धंदे कायमस्वरूपी बंद व्हावेत म्हणून ग्रामस्थांनी अनेकदा पोलिस प्रशासन व एक्साइज विभागाला निवेदने देत पाठपुरावा केला आहे. परंतु, अद्याप हि संबधित विभागांकडून ठोस कारवाई होत नसल्याने हे धंदे राजरोसपणे सुरु असल्याचा व त्यातून आज पर्यंत रसायनयुक्त ताडी व दारू पिल्याने अनेकांचा बळी व अनेकांचे प्रपंच देशोधडीला लागले आहेत. शासनाची संबधित विभागाची यंत्रणा गप्प का? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. या पूर्वी ही गावात अशा घटना घडल्या असल्याने ताडी व दारूचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी सतंप्त ग्रामस्थांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या