टाकळी हाजीच्या उपसरपंचाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

पुणे, ता. 12 मार्च 2016- तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी टाकळी हाजीच्या उपसरपंचाविरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित सोनाभाऊ गावडे (वय 23, रा. टाकळी हाजी, ता. शिरूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. अजित हा टाकळी हाजी गावचा उपसरपंच आहे. तर, पीडित तरुणी येथील एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करत आहे. तरुणी आणि अजित एका महाविद्यालयात शिकत होते. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. परंतु, त्याचे लग्न ठरल्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होता. ते दोघे जण शिवाजीनगर येथील एका हॉटेलमध्ये गुरुवारी (ता. 10) भेटले होते. त्या वेळी अजितने तरुणीला त्याचे 25 मार्च रोजी लग्न असल्याचे सांगितले. त्यावरून दोघांमध्ये झालेल्या भांडणात अजितने तिला मारहाण केली. त्यानंतर तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. उपसरपंच अजित हा शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचा नातू आहे.

दरम्यान, टाकळी हाजीच्या उपसरपंचावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे शिरूर तालुक्यात चर्चेला उधान आले आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या