कवठेतील हायस्कूलच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावू- कोलते

कवठे यमाई, ता. 29 मार्च 2016 (सुभाष शेटे) - येथील येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या जुन्या इमारतीस आग लागून काही वर्ग खोल्या व प्रयोगशाळा आगीच्या भक्षस्थानी पडल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून संस्था व ग्रामस्थ यांच्या समन्वयातून या इमारतीच्या छताची दुरुस्ती अथवा नवीन इमारती संदर्भात लवकरच विभागीय कार्यालयात बैठक आयोजित करून त्यात निर्णय घेवून हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य विजय कोलते यांनी केले.

येथील येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या जुन्या इमारतीस आग लागून काही वर्ग खोल्या व प्रयोगशाळा आगीच्या भक्षस्थानी पडली ही घटना निश्चितच क्लेशदायक घटना आहे. इमारतीची पहाणी करताना या इमारतीच्या दुरुस्ती बाबत ग्रामस्थांसोबत झालेल्या विचार विनिमय बैठकीत कोलते बोलत होते.
      
या वेळी शिरूरचे माजी नगराध्यक्ष जाकिरखान पठाण, केसनंदचे सरपंच चंद्रकांत सातव, संजय शितोळे, पंचायत समिती सदस्या डॉ. कल्पना पोकळे, सरपंच, उपसरपंच, स्कूल कमेटी अध्यक्ष अर्जुन सांडभोर, उपाध्यक्ष मिठूलाल बाफणा, सदस्य रितेश शहा, ग्रामपंचायत सदस्य राजेश सांडभोर, हर्शल काळे, बबन बाळासो पोकळे, गुलाबराव वागदरे, प्राचार्य अशोक बोरुडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

जुनी झालेली इमारत पाडून त्या ठिकाणी सुसज्ज नवीन इमारत उभी करण्यात यावी, त्यासाठी लागणारा पन्नास टक्के निधी ग्रामस्थ उपलब्ध करून देतील, असे आश्वासन ग्रामस्थांच्या वतीने सरपंचांनी कोलते याना दिले. हायस्कुलच्या जुन्या इमारतीची दुरुस्ती अथवा नवीन बांधकामा संदर्भात योग्य तो विचार विनिमय करण्यासाठी संस्थेच्या पुणे येथील विभागीय कार्यालयात पुढील महिन्यात संस्थेचे पश्चिम विभाग अध्यक्ष माजी आमदार राम कांडगे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांसह तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कोलते यांनी दिली. तूर्तास आता परिक्षा सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही या दृष्टीकोनातून नियोजन करण्यात आले आहे, असे प्राचार्य बोरुडे यांनी सांगितले.
कवठ्यातील इमारतीच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी- कांडगे
कवठे यमाई, ता. 26 मार्च 2016 (सुभाष शेटे)
-
येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश हायस्कुलच्या जुन्या इमारतीला लागेल्या आगीची घटना अत्यंत दुर्दैवी असून, या आगीमुळे इमारतीचे मोठेच नुकसान झालेले आहे. विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता संस्थेच्या माध्यमातून इमारतीच्या दुरुस्तीसाठी तातडीने 10 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, असे रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष माजी आमदार राम कांडगे यांनी सांगितले.

येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या जुन्या इमारतीस लागलेल्या आगीचे वृत्त समजताच राम कांडगे व शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, संस्थेचे मेनेजिंग कौन्सिलचे माजी सदस्य किसनराव रत्नपारखी, संस्थेचे पश्चिम विभाग स्थापत्य अभियंता संजय भोर, सहायक फौजदार के डी थोरात, पोलिस हवालदार प्रकाश कोकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

माजी विद्यार्थी संघटना मांजरी, हडपसर या परिसरातील संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या सहयोगातून ४ लाख रुपयांचा निधी या इमारतीच्या कामासाठी उपलब्ध करुन देणार असल्याचे श्री. रत्नपारखी सर यांनी सांगितले. गावात तातडीने या प्रश्नी ग्रामसभा घेवून शाळेच्या कामासाठी ग्रामस्थ ही जास्तीत जास्त आर्थिक योगदान देणार असल्याचे स्कुल कमेटी अध्यक्ष अर्जुन सांडभोर, उपसरपंच, माजी उपसरपंच दीपक रत्नपारखी, रामदास रोहिले व ग्रामस्थानी आश्वासन दिले आहे. या परिसरातून या शाळेत शिक्षण असलेल्या आपल्याच मुलांची होणारी गैरसोय लक्षात घेता ग्रामस्थांनी एकत्रित विचाराने ही इमारत तातडीने दुरुस्त होण्याकामी सर्वोतोपरी निधी उपलब्ध करून देण्याकामी योगदान देण्याचे आवाहन पोपटराव गावडे यांनी उपस्थित ग्रामस्थांना केले.

येथील हायस्कूलच्या जुन्या इमारतीचा दुरुस्ती प्रस्ताव संस्थेच्या विभागीय कार्यालयाकडे सादर करण्यात आल्याचे प्राचार्य अशोक बोरुडे यांनी सांगितले. सदर इमारतीच्या छताचे आयुष्य संपलेले होते. दुर्दैवाने काल याच इमारतीतील ३ वर्गखोल्या अचानक लागलेल्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत. विद्यार्थ्यांची इमारती वाचून होणारी गैरसोय लक्षात घेता जुन २०१६ मध्ये सरू होणा-या नवीन शैक्षनिक वर्षारंभी ही इमारत सज्ज होणार असल्याचे संस्थेचे पश्चीम विभाग स्थापत्य अभियंता संजय शिवाजी भोर यांनी सांगितले.

दरम्यान, येथील हायस्कूलच्या जुन्या इमारतीत आग लागल्याचे समजताच स्थानिक वायरमन श्री. पवार व श्री. गोबाले यांनी तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने या इमारतीचा वीज पुरवठा खंडित केला.
कवठे येमाईत हायस्कूलच्या 3 खोल्या आगीच्या भक्षस्थानी
कवठे यमाई, ता. 25 मार्च 2016 (सुभाष शेटे) - येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या जुन्या इमारतीस गुरुवारी (ता. 24) रात्री नऊच्या सुमारास अचानक आग लागली. योग शाळेसह ३ वर्गखोल्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत. आगीचे कारण समजू शकलेले नाही.

वाढत्या तापमानामुळे प्रयोगशाळेतील रासायनिक साहित्याचे स्पोट होवून आग भडकली असावी अथवा विजेच्या शॉर्टसर्किट मुळे आग लागली असण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या आगीत शाळेची प्रयोगशाळा व ३ वर्गखोल्या पूर्णपणे खाक झाल्याने सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले असण्याचा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

येथे असणारी ही हायस्कुलची जुनी इमारत १९७८ साली बाधण्यात आली होती. लाकडी कैच्या व त्यावर कौले अशी ही टुमदार शालेय इमारत या ठिकाणी बाधण्यात आली होती. या इमारतीत प्रयोगशाळा व वर्ग भरत आहेत. आज रात्री नऊच्या दरम्यान अचानक या जुन्या इमारतीतील प्रयोगशाळा असलेल्या वर्गात सर्व प्रथम आग लागल्याचे प्रत्यक्ष दर्शिंनी सांगितले. घटनेचे गांभीर्य पाहून जवळच असणारे ग्रामपंचायत सदस्य राजेश सांडभोर यांनी तातडीने त्यांचेकडील जनरेटर चालू करून व त्यांच्या डेअरी वरील पाण्याच्या पंपाच्या व परिसरातील तरुणांच्या सहायाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. डॉ. कुंडलिक शितोळे व तरुण वर्गाने अथक प्रयत्नाने इतर वर्गातील साहित्य काढले. घटनेची माहिती समजताच पोलिस निरिक्षक भगवान निंबाळकर व त्यांचा पोलिस ताफा, रयत शिक्षण संस्थेचे सह सचिव आवारी, सरपंच व अनेक ग्रामपंचायत सदस्य, आगीचे ३ बंब, पाण्याचे टॅंकर घटनास्थळी दाखल झाले होते.

दरम्यान, आज या घटनेचा पंचनामा करून तपासाची पुढील दिशा ठरणार असल्याचे शिरूरचे पोलिस निरिक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितले. हायस्कुलच्या जुन्या इमारतीस आग लागल्याचे पाहुन शालेय विद्यार्थी, तरुण व ग्रामस्थ भयभित झालेले दिसत होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या