पोलिसांचा तालुक्यात वचक कमी झालाय? (तालुका वार्तापत्र)

शिरूर, ता. ३ एप्रिल २०१६ (मुकुंद ढोबळे) : शिरूर तालुक्यांत अनेक प्रकरणात पोलिस व गुन्हेगार यांच्यात तडजोडी होत असल्याने पोलिसांची भीती आता गुन्हेगारांना राहिली नाही. गुन्हेगार पोलिसांनाच अरेरावी करीत असल्याचे चित्र दिसत असून आता पोलिसांनी सावध राहून पोलिसी खाक्या वापरण्याची गरज आहे.
 
शिरूर तालुक्याची संपुर्ण ओळख आता बदलत चालली आहे. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे संपुर्ण राज्यात वेगळी ओळख निर्माण होऊ लागली अाहे. या परिसरातील औद्योगिक वसाहतीमुळे ठेका घेण्यावरून अनेकवेळा वाद उफाळून आले अाहेत. ठेक्यातून मिळणारा पैसा यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गुंडगिरीला चालना मिळाली अाहे. त्यात वाढता पैसा यामुळे गुन्हेगार लोकांनी या भागातील पोलिस यंत्रणाच दावणीला बांधली का? असा संशय येत आहे .

यामुळे या भागात अवैध दारू पासून ते अत्याधुनिक रिव्हॉल्वर विकण्यापर्यंत अनेकांची मजल गेली होती. यातील अनेक जनांना अटक देखील केली अाहे. काही दिवसापुर्वी शिक्रापुर भागात बनावट नोटा विक्री करणारी टोळी पकडण्यात आली होती. त्याचप्रमाणे बनावट दारू तयार करणारे दोन कारखाने उत्पादन शुल्क खात्याने काही दिवसांपुर्वी छापा टाकुन उध्वस्त केले आहेत. अनेक मोठ-मोठे गुन्हे शिक्रापुर, रांजणगाव, शिरूर पोलिस हद्दीत घडले अाहेत. परंतु यावर पोलिसांनी ज्या प्रकारे तपास करणे आवश्यक होते तसा तपास करण्यास पोलिसांची कुठेतरी कमी निदर्शनास येते.

अनेक घटनांमध्ये पोलिस खात्याने कधीच मोठया गुन्ह्यांतील आरोपी किंवा गुंडांना पोलीसी खाक्या दाखवण्यात रस न दाखवता त्यांची खातरदारी करण्यात रस दाखवला आहे. मोठ-मोठया घटना घडूनही त्याच्या मुळाशी हे तिन्ही पोलिस स्टेशनचे पोलिस का गेले नाही यांचा मूळ फक्त "अर्थकारण" असल्याचे दिसून येते आहे. अनेक घटनांमध्ये रक्तपात होऊनही किरकोळ केस दाखून आरोपींना काही तासात सोडून द्यायचे हा कुठला कायदा या पोलिसांनी आणला आहे, हेच आता नागरिकांना कळत नसल्याचे चित्र आहे.

यामुळे या भागातील गुन्हेगारांना कसलाही गुन्हा केला तर "ना पोलीसी खाक्या ना कुठलाच त्रास" असा समज होतो. यामुळे गुन्हेगार चांगलेच सोकावले तर आहेच. परंतु त्यांच्यात मग्रुरी देखील वाढली आहे. याचा तोटा आता पोलिसांना होत आहे. यातील अनेकांची पोलिस स्टेशन मधे पोलीसांनाच अरेरावी झाल्याचे प्रकार घडले अाहे. तर शिरूर शहरात पोलिसांच्या विरोधात रिक्षाचालकांनी पोलिस स्टेशन येथे पोलिसांचाच निषेध करण्याचे प्रकार झाले आहेत.

यातून फक्त एकच लक्षात येते की पोलिस गुन्हेगार, अवैध धंदे वाले यांच्यामधील "अर्थकारण" असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यात पोलिसांचा वचक राहिला नाही. यापुढील काळात पोलीसांना यामुळे मोठया संकटाला सामोरे जावे लागेल, त्या अगोदर पोलिसांनी खरा पोलीसी खाक्या दाखवणे गरजेचे आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या