शिरूरच्या पश्चिम भागाला अवकाळी पावसाचा तडाखा

कवठे यमाई, ता. 7 एप्रिल 2016 (सुभाष शेटे)- शिरूरच्या पश्‍चिम भागातील सविंदणे, कवठे येमाई, इचकेवाडी परिसरात बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार वा-या सह सुमारे अर्धा तास तडाखा दिला. वेगवान वा-यासंह आलेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला आहे. काढलेला कांदा झाकण्यासाठी शेतक-यांची धावपळ सुरू होती.

गेले दोन दिवसांपासून शिरूरच्या पश्‍चिम भागातील या परिसरात सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार होत आहे.त्यामुळे प्रचंड उष्मा जाणवत असल्याने नागरिक हैराण झालेले दिसत आहेत. मंगळवारी रात्री दहाच्या दरम्यान 15 मिनिटे पावसाने कवठे येमाई परिसरात हजेरी लावली होती. बुधवारी सायंकाळी नभ भरून आले व सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान वेगवान वा-यासह आलेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सविंदणे, कवठे येमाई परिसरात सुमारे अर्धा तास ब-यापैकी पाऊस बरसला शेतात काढून ठेवलेल्या कांदा पिकाला या पावसाचा जोरदार फटका बसणार आहे.

कवठे येमाई, सविंदणे परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. कवठे मुख्य बाजार पेठेतून पाण्याचा मोठा लोंढा सुमारे अर्धा तास वाहत होता. अनेक ठिकाणी उन्हाळी कांदा काढणी सुरू असून काढलेले कांदे अनेक ठिकाणी भिजले आहेत. अधून-मधून पडणा-या व शेतीमालाचे नुकसान करणा-या अवकाळी पावसाने शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाच्या तडाख्याने शेतात साठवून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान होणार असल्याने आधीच पाणी टंचाईने मेटाकुटीस आलेले शेतकरी मोठेच आर्थिक संकटात सापडत चालल्याचे सविंदणे येथील शेतकरी सत्यवान पडवळ, माजी ग्रामपंचायत सदस्य बाबाजी बळीबा पडवळ, सावित्रीबाई ज्ञानेश्‍वर पडवळ यांनी सांगितले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या