दुष्काळ ठरतोय मरणयातना तर काहींना 'अच्छे दिन'

सादलगाव,  ता. २९  मे  २०१६ ( संपत कारकुड ) : शिरुर तालुक्याच्या  पुर्व भागातील जलस्त्रोत आटल्यामुळे दुष्काळाची तिव्रता अधिक वाढली असून काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे तर दुसरीकडे वाळुचोरांसाठी मात्र हेच  अच्छे दिन अाले अाहेत.

शिरुर  तालुक्याच्या पुर्व भागातील सिंचनाखालील हजारो हेक्टर शेती धोक्यात अाली असून यामध्ये न्हावरे ते तांदळी दरम्यान येणा-या निर्वी, शिरसगाव काटा,पिंपळसुटी,इनामगाव तसेच कोळगाव डोळस इत्यादी गावांमध्ये तिव्र पाणी टंचाई जाणवत आहे. शेतकरी आपल्या शेतातील जनावरांचा चारा जगविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहवयास मिळत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे खर्चावरही मोठया मर्यादा आल्या असून शेतकरी काटकसरीने आपल्या प्रपंचाचा गाडा ओढत आहे. आर्थिक खर्चाच्या सर्व योजना सध्या थांबविल्या असल्याचेही निदर्शनास येत आहे.

एकिकडे शेतक-यांना वरदान ठरलेल्या व बारमाही हमखास पाणी असलेले भिमानदीवरील सर्व बंधा-यातील पाणी शेवटचे घटके मोजत असून शेतकरी आपल्या उसाला व इतर पिकांना शेवटचे पाणी देवून पावसाची वाट पाहत आहेत.कधी नव्हे अशी वेळ यंदा शेतक-यांवर आली असून नदीमधील तळाला गेलेले पाणी शेतीला देण्यासाठी काही शेतकरी पीव्हीसी पाईप लांबवून-लांबवूनही मोठ्या चिकाटीने शेतीला शेवटचा गराळा देत आहेत. भिमेच्या बंधा-यातुन दौंड तालुक्यासाठी काहि दिवसांपुर्वी  3 टीएमसी पाणी सोडताना बंधा-यातील अगोदर साठविलेले पाणी मोठया प्रमाणात वाहुन गेल्यामुळे ही परिस्थिती ओढावलेली असल्याची तक्रार बहुसंख्या शेतक-यांनी व्यक्त केली आहे. शेवटी ज्यांना पिण्याचे पाणी पोहोच करावयाचे होते त्यांना तर पोचले नाहीच परंतु सिंचनाखालील ज्या पिकांना पाणी राहुन ती वाचू शकली असती ती मात्र जळण्याच्या मार्गावर आहेत. याचा लघुपाटबंधारे विभागाने विचार करावा, अषा सुचना शेतक-यांकडुन होत आहेत.
 
वाळू चोरांना अालेत  सुगीचे दिवस

भिमानदी व त्यावरील बंधारे आटल्यामुळे मोकळया झालेल्या जागेतील सर्व वाळु उघडी पडल्यामुळे वाळुचोरांचे मात्र फावले असून सध्या आहोरात्र जेसीबी, पोकलॅनद्वारे वाळु चोर खुले आम वाळुचोरी करताना दिसत आहेत. वाळुचा लिलाव झाल्यावरही एवढी वाहतुक नसते एवढी वाहतुक सध्या कोरडया पडलेल्या या नदीमध्ये दिसून येत असून जमेल तशी वाळुचोर वाळु बाहेर काढताना दिसत आहेत. यावर प्रशासन मात्र बघ्याची भुमिका घेत असून वडगाव रासाई व मांडवगण फराटा तलाठी व मंडलअधिकारीही यामध्ये सहभागी असल्याशिवाय अशी चोरी होवू शकत नाही. हे वाळु चोर गोरगरीब नागरिकांना चढया भावाने वाळुची विक्री करुन लुटत आहेत. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे नदीची चाळण झाली आहे. तसेच नदीकाठी पोयटा स्वरुपातील माती उचलण्याचा बेकायदेशीर धंदाही तेजीत असून बहुसंख्य शेतकरी आपल्या संपत्तीच्या जोरावर एक दिवसात ताफा लावून माती उचलून आपल्या शेतामध्ये घेवून जात आहेत.

एकंदरीत चालु दुष्कळ काहींना मरणयातना ठरत असला तरी काहींना मात्र सोन्याचे दिवस असल्यासारखा भासत आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या