तळेगाव,शिक्रापूरात वेळ नदीची झाली 'गटार गंगा'

तळेगाव ढमढेरे, ता. ५ जुन २०१६ ( प्रा.एन.बी.मुल्ला) : तळेगाव ढमढेरे व शिक्रापूर येथील भूमिगत गटारींमधून सांडपाणी व मैलापाणी ओढया नाल्यामार्फत वेळनदीत सोडल्याने वेळ नदीला गटार गंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.स्थानिक प्रशासनाने देखील या समस्येकडे दुर्लक्ष  होत अाहे.
       
दिवसेंदिवस वाढत्या औद्योगिकरणामुळे व नागरीकरणामुळे शिक्रापुर,तळेगाव ढमढेरे परीसरात लोकसंख्या भरमसाठ वाढली आह.बिल्डर लॉबीने उंचच्या उंच इमारती उभ्या केल्या मात्र ड्रेनेजच्या सांडपाण्याचे योग्य नियोजन नसल्याने भूमिगत गटारीमधून सांडपाणी व मैलापाणी सर्रास वेळ नदीमध्ये सोडले जात आहे.शिक्रापूर येथील नळपाणी पुरवठा योजना ही येथील बंधा-यावर व वेळनदीपात्रालगत असलेल्या विहीरीवरून आहे. शिक्रापूरात पूर्वीचा एक कोल्हापूर पध्दतीचा बंधारा आहे मात्र वाढत्या लोकसंख्येचा विचार करून व पाण्याची गरज ओळखून ब्रिटीशकालीन पुलाच्या पुर्वेला आणखी एक नव्याने मिनी बंधारा बांधण्यात आला आहे.मात्र या बंधा-यात ड्रेनेजचे घाण पाणी तुंबलेले आहे.तसेच या बंधा-याच्या खालील बाजूने मोठया प्रमाणात कचरा व टाकावू पदार्थ टाकण्यात येतात त्यामुळे पाहता क्षणी या ठिकाणी कचरा डेपो असल्याची प्रकर्षाने जाणीव होते.हा कचरा अधूनमधून जाळला जातो त्यामुळे सर्वत्र धूर पसरतो.अशा प्रकारे जलप्रदूषण,भुप्रदूषण व वायूप्रदूषणाचा  शिक्रापूरकरांना सामना करावा लागत आहे.वेळ नदीचे पाणी परक्यूलेशनने विहीरीत जाते.परंतु वेळ नदीतच ड्रेनेजचे पाणी साचून रहात असल्याने व हेच पाणी विहीरीत मुरत असल्याने येथील नागरीकांच्या आरोग्यास धोका आहे.तळेगाव ढमढेरे येथील नळपाणीपुरवठा योजना देखील भैरवनाथ बंधा-यावरून आहे.

या बंधा-यात देखील ड्रेनेजचे पाणी साचून राहील्याने गावाला दुषीत पाणीपुरवठयाचा सामना करावा लागतो.पर्यायाने अनेक साथीच्या आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.सध्याच्या दुष्काळी परीस्थितीतीत वेळ नदी पात्र कोरडे आहे.मात्र ड्रेनेजच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी डबकी साचली असून त्यामुळे दुर्गंधी सुटल्याने परीसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.इतकेच नव्हे तर तळेगाव ढमढेरे येथील वेळ नदी पात्रात ओला,सुका कचरा तसेच प्लॅस्टिक, भंगार साहीत्य व आठवडे बाजार झाल्यानंतर बाजार तळावरील टाकावू व खराब झालेला भाजीपाला देखील येथे आणून टाकला जातो.त्यामुळे याठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून वेळ नदी किना-यास कचरा कोंडावळयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

स्थानीक प्रशासनाने लक्ष घालून या वाढत्या भूप्रदूषण व जलप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी सांडपाण्याचे व कच-याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.अन्यथा परीसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.वेळ नदी पात्र व नदी किना-याची तातडीने स्वच्छता करण्याची मागणी ही परीसरातील नागरीकांनी केली आहे.


Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या