गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस मित्रांनी सतर्क रहावे – गलांडे

शिक्रापूर ,   ता. ११ जुलै २०१६ (प्रतिनीधी) : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस मित्रांनी जागरूक व सतर्क रहावे असे आवाहन शिक्रापूर पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी केले आहे.

शिक्रापूर येथे पोलीस मित्र मेळावा शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नुकताच  आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलिस मित्रांना मार्गदर्शन करत असताना गलांडे बोलत होते.

यावेळी गलांडे पुढे म्हणाले कि सध्या शिक्रापूर सह परीसरातील अनेक गावांमध्ये चोऱ्या आणि घरफोड्या यांचे प्रमाण वाढत आहेत परंतु यापूर्वी अनेक घरफोड्या पोलीस मित्रांमुळे टाळल्या तर काही घरफोड्या व चोरींच्या गुन्ह्यांसोबत इतरही गुन्हे पोलीस मित्रांमुळे उघडकीस आले आहेत.  पोलीस मित्र देखील आता चांगले काम करू लागलेले आहे त्यामुळे पोलीस मित्रांनी देखील आता जास्त पुढाकार घेऊन यापुढील काळामध्ये सतर्क राहावे.कोठेही अनोळखी व संशयास्पद व्यक्ती, वाहने आढळून आल्यास त्वरित पोलीस स्टेशन ला माहिती द्यावी. सर्वांनी आपापल्या गावामध्ये रात्रगस्त सुरु करावी यासाठी पोलिस मित्रांना योग्य ती मदत केली जाईल व यापुढे पोलिस मित्रांसाठी प्रत्येक महिन्यात बैठक आयोजित करून योग्य काम करणाऱ्या पोलिस मित्रांचा सन्मान करणार आहे असे ते या वेळी म्हणाले.

याप्रसंगी परिसरातील शाळा व महाविद्यालये या ठिकाणी रोडरोमिओंचा उपद्रव वाढलेला आहे असा मुद्दा पोलिस मैत्रिणींनी उपस्थित केला असता सध्या रोडरोमिओंची माहिती घेण्यासाठी चार पोलिस व चार पोलिस मित्रांचे पथक तयार केलेले असून ते शाळा व महाविद्यालये या ठिकाणी साध्या वेशात थांबून माहिती गोळा करत अाहेत.तसेच यापुढे रोडरोमिओंची गय करणार नसून यामधून कोणालाही सोडणार नसल्याचे देखील गलांडे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पोलिस मित्र  अंकुश घारे, अनिल कोल्हे, सुरेश हरगुडे यांनी पोलिस मित्रांमुळे झालेल्या चांगल्या कामांची तसेच उघडकीस आलेल्या गुन्ह्यांची माहिती उपस्थित पोलिस मित्र आणि मैत्रिणींना दिली. तर पंचायत समिती सदस्या दिपाली शेळके, ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर, पोलिस उपनिरीक्षक महादेव पाटील,रमेश भुजबळ यांनी देखील उपस्थित पोलीस मित्रांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व पोलिस मित्रांच्या वतीने पोलिस निरीक्षक रमेश गलांडे यांचा पुस्तक व आंब्याचे झाड देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गावांमधील पोलिस मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस नाईक अनिल जगताप यांनी केले तर आभार पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे यांनी मानले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या