वाघाळ्यात युवकांनी स्वखर्चातून केले रस्त्याचे काम!

वाघाळे , ता. 13: गावातील तरुणांनी एकत्र येत कलासागर प्रतिष्ठानची स्थापना करून स्व-खर्च व श्रमदानातून 12 फूट रुंद व 2000 फूट लांब रस्त्याचे मुरमीकरण करून एक आदर्श निर्माण केला आहे. प्रतिष्ठानच्या या विधायक उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

वाघाळे-वरुडे रस्त्यावरून कानिफनाथनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अनेक वर्षे प्रलंबित होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना दळणवळणासाठी अडचणी येत होत्या. विशेषता पावसाळ्यात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. छोट्या रस्त्यामुळे अनेकजण पडले होते. सुमारे 250 कुटुंबांची लोकवस्ती असल्याने या भागातील हा रस्ता होणे अपेक्षित होते. पण, सरकारी पातळीवरून कायम दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे गावातील तरुणांनी एकत्रित येऊन कलासागर प्रतिष्ठानची स्थापना केली. एकत्रित आलेल्या तरुणांनी स्व-खर्च व श्रमदानातून रस्त्याचे मुरमीकरण केले. सुमारे 12 फूट रुंद व 2000 फूट लांब असणाऱ्या या रस्त्यासाठी एक लाख रुपये खर्च आला आहे. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणही करण्यात आले आहे. या रस्त्याचे उद्‌घाटन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामभाऊ सासवडे, कैलास सातव, विक्रम पाचुंदकर, राजेंद्र भोसले, कलासागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ओंकार थोरात, शरद धायबर, संतोष गोरडे, संदीप धायबर, योगेश शेळके, किसन गोरडे, आनंदराव सोनवणे, बाळासाहेब थोरात, लहू थोरात, विकास थोरात, राजेंद्र जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रामदास थोरात, बाळासाहेब थोरात, पांडूरंग थोरात, लक्ष्मण थोरात, मारुती थोरात यांच्या जमिनीमधून रस्ता तयार करण्यात आला आहे.

"गावात अनेक विकासकामे होणे गरजेचे आहे, त्यासाठी सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा तरुणांनी विकासकामांसाठी एकत्रित येण्याची गरज आहे. कलासागर प्रतिष्ठानने केलेला उपक्रम विधायक आहे,'' असे दाभाडे म्हणाले. दिलीप थोरात यांनी सूत्रसंचालन केले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या