ग्रामपंचायतींना पुन्हा येणार ‘अच्छे दिन’

शिरूर ,  ता.२१जुलै २०१६ (सतीश केदारी) : ग्रामपंचायतीना करवसुली करण्याचे व नोंदीचे अधिकार  देण्यात आल्याने ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढून ग्रामपंचायतींना पुन्हा ‘अच्छे दिन’येणार अाहेत.

मार्च 2010 पासून राज्यातील ग्रामपंचायतींचे गावठाण हद्दीसह गावठाणाबाहेरील हद्दीतील बांधकामाच्या नोंदी नमुना क्रमांक 8 ला न घेण्याचे व करआकारणी न करण्याचे ग्रामपंचायतींना बंधन आले होते.अामदार बाबुराव पाचर्णे यांनी डिसेंबर २०१५ च्या नागपुर हिवाळी अधिवेशनात या संदर्भात प्रश्न देखील उपस्थित केला होता.शासनाने मध्यंतरी सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अहवाल एप्रिल 2016 अखेर मागितले होते. ते सर्व अहवाल सकारात्मक आले. त्यानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 124 व त्याअंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर आणि शुल्क नियम 1960 यामधील तरतुदीनुसार गावाच्या सीमेतील (शिवरस्त्याच्या आतील) इमारती मग त्या कृषी आकारणीस आधीन असोत किंवा नसोत व जमिनी (बखळ जागा) ज्या कृषी आकारणीस आधीन नाहीत यावर ग्रामपंचायतीस कर बसविण्याचे अधिकार आहेत.
 
त्या अनुषंगाने ग्रामपंचायत हद्दीतील मिळकतीवर विहित पध्दतीने करआकारणी करून करवसुली करण्याबाबत; तसेच याकरिता करपात्र मिळकतीच्या नोंदी ग्रामपंचायतीकडील नमुना क्रमांक 8 म्हणजेच करआकारणी नोंदवहीमध्ये करण्याबाबत तरतूद आहे. या तरतुदीनुसार ग्रामपंचायत हद्दीतील ज्या इमारतींना विहित पद्धतीने बांधकाम परवानगी घेतलेली असो अथवा नसो, अशा इमारतीची ग्रामपंचायतीकडील नमुना क्रमांक 8 म्हणजेच करआकारणी नोंदवहीमध्ये नोंद घेण्यात येऊन विहित पध्दतीने करआकारणी करून करवसुलीची कार्यवाही करण्यात यावी, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे. सर्व जिल्हा परिषद सर्व ग्रामपंचायती यांना आदेश पाठविण्यात आला असून, लवकरच ग्रामपंचायतीमध्ये मार्च 2010 पासून रखडलेल्या सर्व नोंदी व नवीन बांधकामाच्या नोंदी नमुना क्रमांक 8 ला घेण्यात येणार आहेत.

अडचणीतीेल ग्रामपमचायतींना नवसंजीवनी

शिरुर हवेली मतदारसंघातील वाघोली,उरुळी कांचन, कदमवाकवस्ती,लोनीकाळभोर,थेउर,शिरुर ग्रामीण ,तर्डोबाचीवाडी,शिक्रापुर,यांसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीना या निर्णयाचा फायदा होणार असुन कोट्यावधींची रुपयांचे उत्पन्न वाढणार अाहे.त्याचप्रमाणे अडचणीत अालेल्या छोट्या ग्रामपंचायतींना देखील पुन्हा नवसंजीवनी मिळणार असल्याने तालुक्यासह सर्वच ग्रामपंचायतींना पुन्हा लवकरच अच्छे दिन येणार असल्याचे अामदार  पाचर्णे यांनी संकेतस्थळाशी बोलताना सांगितले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या