स्वप्नातील गावाच्या विकासासाठी नागरिकांचे प्रयत्न

सादलगाव/कवठे यमाई, ता.४ अॉगस्ट २०१६ (संपत कारकुड/सुभाष शेटे) : अामचं गाव अामचा विकास या अंतर्गत सादलगाव ला ७१ लाखांचा अाराखडा  सादर करण्यात अाला.तर कवठे येमाई येथे या उपक्रमांतर्गत  विविध कार्यक्रमाचे अायोजन करण्यात अाले.स्वप्नातील गावासाठी अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद तर काहि ठिकाणी निरुत्साह देखील दिसुन येत अाहे.

थेट नागरिकांच्या सहभागातून गावचा विकास आराखडा तयार करण्यात येत असलेल्या ‘आमचं गाव आमचा विकास’ उपक्रमाध्ये  सादलगावात 71 लाख 28 हजार रुपये खर्चाची विविध विकास कामे करण्याचा आराखडा नागरिकांकडुन तयार करण्यात आला आहे.
1 ते 3 ऑगस्ट दरम्यान गावामध्ये ‘आमचं गाव आमचा विकास’ या कार्यक्रमात गावचे सरपंच, सदस्य तसेच प्रत्यक्ष नागरिक, गावातील तज्ञ व अनुभवी नागरिक, शिक्षक, जिल्हा परिशद व पंचायत समिती स्तरावरील एक शासकिय कर्मचारी, कृषी अधिकारी, अंगणवाडी शिक्षिका व आरोग्य कर्मचारी यांच्या संयुक्त सहमतीने घेतलेल्या तीन दिवसांच्या चर्चेमध्ये गावातील विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे.

यामध्ये प्रामुख्याने गावचे अंतर्गत रस्ते कॉंक्रेटिकरण, नदीकडे जाणारे विविध चार घाटांचे बांधकाम व रस्ते दुरुस्ती, घंटा गाडी, रुग्णवाहिका, कचराकुंडया, मातंग समाज मंदिर बांधकाम, अभ्यास दौरे, अंतर्गत गटारलाईन आणि वृक्षारोपण, महिला व बालकल्याणावरील उपाययोजना, शिबिरे इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.

कधी नव्हे एवढया योजना आणि त्याही पुढील चार वर्षांसाठी ठरविताना चर्चा फक्त तीन दिवस. त्यामुळे ग्रामस्थांना योजना सुचविताना डोके खाजविण्याचे प्रसंग उदभवत होते. आराखडयात सुचविलेल्या योजना अंमलात आल्या तर गावचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. यापुर्वी गावामध्ये एखादे काम करावयाचे म्हटंले की संबंधित कामाचा प्रस्ताव तयार करुन त्या कामांना अधिकृत मंजुरी घ्यावी लागते असे. प्रस्ताव दिल्यानंतरही कित्येक दिवस ते मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे रखडले जात असे. जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे गावातील कारभा-यांना खेटे घालावे लागत असे.

 ग्रामपंचायत प्रस्ताव ते प्रत्यक्ष मंजुरीच्या दरम्यान कित्येक दिवस वाया गेल्यामुळे गावोगावचे विकास खुंटले जात होते. अशा कामाच्या वेळी लोकप्रतिनिधीची मनधरणी करावी लागत असे. परंतु शासनाने ही साखळीच संपुष्टात आणून थेट गावच्या नागरिकांच्या हातातच दिला अाहे. विकास व आराखडा, निधी आणि त्याचा वापर हे सर्वच ग्रामपंचायत स्तरावर करावयाचे ठरविल्यामुळे लवकरच प्रत्येक गाव आत ‘स्मार्ट गाव’ दिसणार आहे यात शंका नाही.

सन 2016 च्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्येक गावाला विकासकामांसाठी 80 लाख रुपये केंद्राकडुन देण्याची घोषणा केली होती. यामध्ये जिल्हा परिषद व पंचायती टाळुन थेट गावाला निधी देवून विकास करावयाचे धोरण आखले होते. यामधील पहिल्या वर्षाचा हप्ता प्रत्येक गावाला देवून काही विकास कामेही करण्यात आली होती.

'निर्णय चांगला' नागरिकांच्या प्रतिक्रिया
ग्रामस्तरावरच नागरिकांच्या गरजा व माग़णी लक्षात घेवून प्रत्यक्ष चर्चा घडवुन सुचलेली कामे म्हणजे थेट विकासालाच हात घातलेल्या शासनाच्या या योजनेचे गावातील सर्व स्तरांतुन मोठे स्वागत होत असून नागरिक आपल्या ‘स्वप्नातील गाव’ उभा करण्यासाठी थेट जनतेचा सहभाग ही संकल्पना अंमलात येताना नागरिकांच्या जीवनमान व विकासावर याचा चांगला परिणाम होणार आहे. पुढील चार वर्षांमध्ये गावाचा चेहरा-मोहरा बदलणार असल्यामुळे प्रत्यक्ष जनता या उपक्रमावर अत्यंत खुश असून ग्रामपंचायत विकासाला गती मिळणार आहे.

कवठे  येमाईत विविध कार्यक्रम
कवठे यमाई, ता. ४ अॉगस्ट  (प्रा.सुभाष शेटे) : आमचा गाव आमचा विकास कार्यक्रमा अंतर्गत शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे गावचा विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात दि. ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट पर्यंत ३ दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच सुदाम इचके व ग्रामविकास अधिकारी व्ही के खंबायत यांनी दिली. 

आमचा गाव आमचा विकास कार्यक्रम आराखडा ३ दिवसीय कार्यक्रमाची  तयारी करण्यासाठी श्री येमाई देवी सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपसरपंच अरुण मुंजाळ, अनेक ग्रामपंचायत सदस्य गावात कार्यरत असणारे विविध विभागातील शासकीय कर्मचारी माजी ग्रामपंचायत सदस्य मिठूलाल बाफणा, गणेश रत्नपारखी ,विजयकुमार गांधी,सुरेश गोरे, दिनेश काळे,शिवाजी इचके व अनेक मान्यवर ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. या वेळी  आमचा गाव आमचा विकास कार्यक्रमा अंतर्गत ग्रामसंसाधन गट स्थापन करण्यात आले. आगामी तीन दिवस या कार्यक्रमाअंतर्गत सर्वांच्या विचारातून मला लोकसहभागातून गावाचा विकास आराखडा तयार करण्यात येणार असून ग्रामस्थांमध्ये या विषयी जनजागृती व्हावी म्हणून गावातून सायंकाळच्या सुमारास मशाल पेटवून जनजागृती फेरी काढण्यात आली.

आगामी ३ दिवस होणा-या कार्यक्रमातून गावाचा विकास आराखडा तयार करावयाचा असल्याने या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन गावाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या