सादलगाव बंधा-याचा पिलर उखडला

सादलगाव, ता.४ अॉगस्ट २०१६ (संपत कारकुड) : खडकवासला धरणांतुन नुकत्याच सोडलेल्या पाण्याने भिमा नदी दुधडी भरुन वाहत असून सादलगाव-हातवळण दरम्यानच्या बंधा-याच्या मोरीचा एक पिलर पाण्याच्या प्रचंड दाबामुळे 2 ते अडीच फुट निखळला आहे.

खडकवासला धरणांतुन सोडलेल्या पाण्यांमुळे भिमा नदीला मोठा पुर आला असून या नदीवरील बहुतांश बंधारे पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यापैकी सादलगाव येथील सर्वात मोठा समजला जाणारा बंधा-याच्या काही पिलरची दुरुस्त्यांची वेळ आली असताना नुकत्याच आलेल्या पाण्यामुळे बंधा-याची स्थिती अधिकच धोकादायक झाली आहे. तुटलेली पिलर जरी छोटी तुटली असली तरी भविष्यकाळासाठी हि धोक्याची घंटा अाहे का ? असा प्रश्न उपस्थित होतो. या बंधा-याचा वापर नागरिकांकडुन एखांद्या पुलासारखा होत असून यावरील सर्व वाहतुक (ता.४) दुपारी 2 वाजल्यापासुन ठप्प झाली आहे. सध्या येथील नागरिक वडगाव रासाई पुलावरुन जा-ये करीत असून अधिक पाणी वाढल्यास वडगाव रासाई पुलाबरोबर पाणी येवू शकते. असे झाल्यास शिरुर पुर्व भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होवू शकते.

वाळु उपशामुळे बंधा-यास धोका?

बंधा-याच्या वरील बाजुला पाणी येण्याअगोदर मोठया प्रमाणात वाळुचा उपसा चालु होता. या उपश्यादरम्यान येथे मोठ-मोठे खडडेही पडले आहेत. या भुखंडावरील केलेल्या प्रचंड उत्खननामुळे येथील जागेमध्ये मोठया प्रमाणात बदल झाला आहे. या बदलामुळे सादलगावच्या बाजुने बंधा-यावर पाण्याचा नैसर्गिक दाबही वाढला आहे. परिणामी बंधा-याच्या मो-या निखळण्याचा धोका निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

पाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
बंधा-यावरुन होणारी अवजड वाहतुक, बंधा-याच्या आजुबाजुला होणारे वाळुचे उत्खनन, बंधारा अडविताना जिर्ण झालेल्या लोखंडी गेटांचा सर्रासपणे वापर, गळती रोखण्यासाठी अपु-या उपाययोजना यामुळे बंधा-याची थोडयाच दिवसात वाट लागण्याची शक्यता असून याची सर्व जबाबदारी यावर देखरेख करणारे लघुपाटबंधारे विभाग व महसुल विभागावर येते. या नुकसानीची पाहणी करुन शासनाने यावर वेळीच उपाय योजना केली नाही तर हजारो एकर शेती क्षेत्र धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या