दिशादर्शकच नाही... पुलाकडे जायचे कसे?

वडगाव रासाई,  ता.१६ अॉगस्ट २०१६ (संपत कारकुड) : भिमा नदीवर नानगाव (ता.दौंड) ते वडगाव रासाई (ता.शिरुर)  दरम्यान 10 कोटी रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या पुलाकडे जायचे कसे? हा प्रश्न या पुलावरुन पहिल्यांदाच जाणा-या वाहनचालकाला आजही पडतो. याचे प्रमुख कारण म्हणजे वडगाव रासाई गावातुन पुलाकडे जाण्यासाठी कोणतेही मार्गदर्शन करणारा दिशादर्शक फलक नसल्यामुळे ही अवस्था झाली आहे.

सोलापूर महामार्ग व नगर महामार्गाला जोडणा-या पारगाव (ता. दौंड) येथील पुलाचे काम अद्याप पुर्ण झाले नसल्यामुळे या पुलावरील सर्वच वाहतुक पुल बंद केल्यापासून वडगाव रासाई येथील नवीन पुलावरुनच होत असते. मोठया दोन हमरस्त्याला जोडणा-या भिमा नदीवरील वडगाव रासाई पुलाला अलिकडे फार म्हत्व प्राप्त झाले आहे. येथे मोठया संख्येने वाहनांची सततची वर्दळ असते. परराज्यातून एमआयडीसीकडे जाणा-या प्रत्येक अवजड वाहनांना हा पुल सध्या योग्य पर्याय ठरतो आहे. परंतु वाहन घेउन नगर माहामार्गाकडुन वडगाव रासाईपर्यंत आल्यानंतर अथवा सोलापूर महामार्गाने नानगावपर्यंत आल्यानंतर पुलाकडे जायचे कसे? हा प्रश्न प्रत्येक वाहनधारकांना पडतो.

याचे प्रमुख कारण म्हणजे पुलाकडे जाणारा दिशादर्शक फलकच नाही. प्रत्येक वाहनचालक येथे आल्यानंतर बुचकळयात पडल्याशिवाय अथवा इतरांना विचारल्याशिवाय पुढे जात नाही. एवढा मोठा खर्च करुन उभा केलेल्या पुलाकडे जाणारे दिशादर्शक अधिकृत फलकच नाही. हे कोणाला पटणारे नाही. पुल नेमका कोठे? आजही वाहनचालकांना पुल शोधावा लागतो.

नुकतेच येथे वडगाव रासाईच्या बाजुने पुलाकडे जाण्यासाठी रस्त्याचे काम पुर्ण झाले असून हा प्रश्न आता कायमचा मिटला आहे. विशेष म्हणजे नुकताच या रस्त्यावर एक फलक झळकत आहे. त्या फलकावर कानगाव आहे परंतु नानगाव नाही. त्यामुळे हा बोर्डही सध्या वाहनधारकांची मोठी फसवणुक करीत आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या