'नागवडे' ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

इनामगाव , ता. १ अॉक्टोबर  २०१६ (सतीश केदारी) : "नागवडे' कारखाना कधीही काटा मारत नसल्याची सभासदांना खात्री असल्यानेच शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऊस देतात. मागीलवर्षी नागवडे कारखान्याने एफआरपी प्रमाणे २१६६ रुपये बाजार भाव दिला आहे. त्यातील पंचेचाळीस रुपयांची उर्वरित रक्कम येत्या १ ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याचे" नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सांगितले.

श्रीगोंदा येथे नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेस राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे प्रथमच वार्षिक सभेला अनुपस्थित होते. मात्र तरीही ही वार्षिक सभा बाजार समिती निवडणुकीच्या धर्तीवर नेत्यांनी घेतलेल्या 'मिले सूर मेरा तुम्हारा'च्या भूमिकेमुळे प्रथमच खेळमेळीच्या वातावरणात पार पडली.

नागवडे कारखान्याची ५१वी वार्षिक सभा राजेंद्र नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी बोलताना नागवडे पुढे म्हणाले, नागवडे कारखाना ही शेतकऱ्यांची कामधेनू आहे. कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यात लाखो रुपयांची जलसंधारणाची कामे केल्याचे सांगत जलसंधारणाच्या कामासाठी मुख्यमंत्री निधीसाठी दहा लाख रुपये दिल्याचेही नागवडे यांनी सांगितले.  कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उसाचे बेणे उपलब्ध करून देण्याचे काम केले.  यावेळी राजेंद्र नागवडे यांनी घोड धरणावरून बंद पाईपलाईन द्वारे तालुक्यात पाणी आणण्याचा ठराव मांडला. तो बहुमताने संमत करण्यात आला.

माजी मंत्री बबनराव पाचपुते म्हणाले, डोळा पद्धतीने ऊस लागवड होणे गरजेचे आहे. विहीर व बोअर पुनर्भरण काळाची गरज बनली आहे. घोड'च्या पाण्यासाठी तालुक्यातील नेत्यांनी एकत्रित लढा दिल्याशिवाय न्याय मिळणार नाही. काही कारखाने करारपत्रकाच्या नावाखाली सभासदांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न करत होते, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे सांगत पाचपुते यांनी अप्रत्यक्षरीत्या आ.  जगतापांवर टीका केली. यावेळी पाचपुते यांनी स्वामीनाथन आयोगाचा अहवाल स्विकारण्याची मागणी करत हा अहवाल स्विकारल्यानंतर शेतकऱ्यांना बाजारभावासाठी भांडण्याची वेळ येणार नसल्याचेही पाचपुतेंनी स्पष्ट केले.

सेनेचे घनश्याम शेलार म्हणाले, नागवडे कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. मात्र साखर विक्री इतर कारखान्याच्या तुलनेत कमी किमतीने असल्याने चिंताजनक आहे. कुकडी'ने नागवडे कारखान्याच्या धर्तीवर कारारनामे केल्याचे सांगितले, याबाबत शेलार यांनी नागवडे कारखान्याकडे स्पष्टीकरणाची मागणी  केली.
               
यावेळी शेतकरी संघटनेचे अनिल घनवट, आप्पासाहेब काकडे, महेश तावरे, श्रीपाद खिस्ती, निळकंठ जंगले, हनुमंत झिटे, भाऊसाहेब बरकडे, प्रशांत दरेकर यांची भाषणे झाली.
                 
या सभेला जि प उपाध्यक्ष अण्णा शेलार, कुकडी'चे संस्थापक कुंडलिक जगताप, नागवडे'चे उपाध्यक्ष केशवराव मगर, काष्टी'चे अध्यक्ष भगवानराव पाचपुते, बाबासाहेब भोस, कुकडी'चे उपाध्यक्ष विश्वास थोरात, जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय, प्रेमराज भोयटे, हेमंत नलगे, दिनकर पंदरकर, विठ्ठलराव काकडे आदींसह सभासद शेतकरी उपस्थित होते. सुभाषराव शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर ऍड सुनील भोस यांनी आभार मानले.

नागवडे'ने 'तसा' करारनामा केला नाही
कुकडी कारखान्याने केलेल्या जाचक करारपत्रकाबाबत सेनेच्या घनश्याम शेलारांनी कुकडी'च्या वार्षिक सभेत प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना कुकडी'चे अध्यक्ष आ राहुल जगताप यांनी "नागवडे कारखान्याने केलेल्या करारपत्रकाच्या धर्तीवरच आपणही करारपत्रक करून घेत होतो असे सांगितले होते. याबाबत शेलार यांनी नागवडे'च्या सभेत विचारणा केली असता नागवडे'चे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी "नागवडे कारखान्याने कधीही अशा प्रकारचे  करारपत्रक सभासदांकडून घेतले नसल्याचे स्पष्ट केले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या