शिरूरला कमळ कोमेजले; पुन्हा धारिवालांचीच सत्ता

शिरुर, ता.१६ डिसेंबर २०१६ : संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या शिरुर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रकाश धारिवाल यांच्या नेतृत्वाखालील शिरूर शहर विकास आघाडीने नगराध्यक्षपदासह २१ पैकी १७ जागा जिंकून नगरपालिकेवर सत्ता कायम ठेवली तर सुकलेले कमळ दोन ठिकाणी उमलले.तसेच एका जागेवर अपक्षाने विजय मिळवल्याने नगरपालिकेत प्रथमच 'शिटी' वाजली अाहे.

शिरुर नगपरिषद ही निवडणुक कार्यक्रम सुरु झाल्यानंतर अारोप- प्रत्यारोप व विविध कारणाने चांगलीच गाजली.गळ्यात गळे घालणा-या भाजपाने ऐनवेळी सवतासुभा मांडल्याने उमेदवारांची चांगलीच धावपळ झाली.त्याचप्रमाणे धारिवाल यांनी देखिल कधी नव्हे इतकी निवडणुक प्रतिष्ठेची केली होती.
गुरुवारी सकाळी दहाला मतमोजणी सुरू झाली. प्रथम प्रभाग क्रमांक १ ते ४ या प्रभागातील आठ जागांची मतमोजणी करण्यात आली. यात आघाडीने सात जागा जिंकत मुसंडी मारली. मात्र आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जाकिरखान पठाण यांना पराभवाचा धक्का बसला. प्रभाग क्र. ३ अ मध्ये लोकशाही क्रांती आघाडीचे उमेदवार मंगेश दत्तात्रय खांडरे यांनी त्यांचा केवळ १३ मतांनी पराभव केला. प्रभाग ४ ते ८ च्या मोजणीत आघाडीला सहा जागा मिळाल्या. प्रभाग ५ मध्ये आमदार बाबूराव पाचर्णे यांचे पुतणे नितीन मच्छिंद्र पाचर्णे यांनी आघाडीच्या अविनाश हरिभाऊ मल्लाव यांचा ८१२ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक ७मध्ये आघाडीचे नेते प्रकाश धारिवाल यांनी लोकशाही क्रांती आघाडीचे उमेदवार संजय तुकाराम बारवकर यांचा १६२३ मतांनी पराभव केला. धारिवाल हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले. याच प्रभागातील 'अ' जागेवर आघाडीच्या उमेदवार उज्ज्वला अभय बरमेचा यांनी प्रतिस्पर्धी लोकशाही क्रांती आघाडीच्या उमेदवार अश्विनी सुदाम पोटावळे यांचा १६४१ मतांनी पराभव केला. त्यादेखील तिसऱ्यांदा निवडून आल्या.

प्रभाग क्र. ८ अ च्या जागेवर आघाडीचे उमेदवार विनोद प्रकाश भालेराव व भाजपचे उमेदवार राजेश दिगंबर जगताप यांना समसमान (७७९) मते मिळाली. फेरमतमोजणी घेण्यात आली. मात्र यात बदल झाला नाही. अखेर दोघांची चिठ्ठी काढण्यात आली. यात नशिबाने भालेराव यांना साथ दिली. ८ ब च्या जागेवर आघाडीच्या सुरेखा संतोष शितोळे यांनी प्रतिस्पर्धी भाजपा पुरस्कृत मायाताई शरद गायकवाड यांचा ४६७ मतांनी पराभव केला. प्रभाग क्र. ९ मध्ये (ब) जागेवर आघाडीचे उमेदवार, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय दत्तात्रय देशमुख यांचा पराभव झाला. ते तीन नंबरवर फेकले गेले. या प्रभागात अपक्ष उमेदवार नीलेश केरू गाडेकर हे ५४२ मते मिळवून विजयी झाले. देशमुख यांना २६९, तर माजी नगरसेवक अबीद मोहम्मद शेख यांना २८४ मते मिळाली. याच प्रभागातील 'अ' जागेवर संगीता महेंद्र मल्लाव यांनी भाजपाच्या उमेदवार संगीता कृष्णा काळे यांचा ५३५ मतांनी पराभव केला.

प्रभाग क्र. १0 मध्ये (अ) भाजपाच्या संदीप ज्ञानदेव गायकवाड यांनी आघाडीच्या कविता यशवंत वाटमारे यांचा १४० मतांनी पराभव केला. 'ब' जागेवर आघाडीच्या उमेदवार रोहिणी किरण बनकर यांनी लोकशाही क्रांती आघाडीच्या उमेदवार राजश्री कुंडलिक शिंदे यांचा ५७७ मतांनी पराभव केला. याच प्रभागाच्या 'क' जागेवर आघाडीच्या उज्ज्वला वैभव वारे यांनी लोकशाही क्रांती आघाडीच्या उमेदवार सविता अनिल बांडे यांचा ४१२ मतांनी पराभव केला.

प्रभाग क्रमांक एक 'अ'मध्ये उमेदवार रेश्मा दादाभाऊ लोखंडे यांनी भाजपा पुरस्कृत मायाताई शरद गायकवाड यांचा ६३३ मतांनी पराभव केला. ब जागेवर आघाडीच्याच सचिन गुलाब धाडिवाल यांनी भाजपाच्या नवनाथ भीमा जाधव यांचा ६४८ मतांनी पराभव केला. प्रभाग दोन (अ) मध्ये आघाडीच्या मुजफ्फर यासीन कुरेशी यांनी भाजपाच्या एएजाज अन्सार बागवान यांचा ४०६ मतांनी पराभव केला. 'ब' जागेवर आघाडीच्या अंजली मयूर थोरात यांनी भाजपा पुरस्कृत पठाण शमशाद महंमदखान यांचा ८६८ मतांनी पराभव केला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या