एमआयडीसीमध्ये यंत्रात अडकून कर्मचाऱ्याचा मृत्यू

रांजणगाव गणपती, ता. 27 डिसेंबर 2016: रांजणगाव एमआयडीसीतील "एसपीएम' कंपनीतील मशिनमध्ये अडकल्याने कैलास महादू निंबाळकर (वय 30, रा. ढोकसांगवी) या सफाई कर्मचाऱ्याचा सोमवारी (ता. 26) सकाळी साडेसातच्या सुमारास मृत्यू झाला.

निंबाळकर हे गेल्या पाच वर्षांपासून एमआयडीसीत पेंटिंग व इतर कामे करत होते. "एसपीएम' कंपनीत ते सोमवारपासूनच कामाला आले होते. वाहनांचे सुटे भाग तयार करणाऱ्या या कंपनीत सोमवारी सकाळी पहिल्या शिफ्टचे काम सुरू असतानाच निंबाळकर साफसफाईचे काम करीत होते. मोल्डिंग यंत्राजवळ सफाई करीत असतानाच "मोल्ड' बनविणाऱ्या दोन यंत्रांमध्ये डोके अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पहिल्याच दिवशी छोट्याशा अपघाताचे निमित्त घडून त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची पत्नी बायमाबाई कैलास निंबाळकर यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून, सहायक पोलिस निरीक्षक सुनील क्षीरसागर पुढील तपास करीत आहेत.

याप्रकरणी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तथापि, या प्रकरणाची कसून चौकशी केली जाणार असून, दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या