शिक्रापुरला वादळासह जोरदार पावसाचे आगमन

शिक्रापुर,ता.१३ मे २०१७ (शेरखान शेख) : शिक्रापुर परिसरात आज शनिवारी(ता.१३) रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वा-यासह धो-धो पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाला चांगलाच दिलासा मिळाला आहे.

दिवसेंदिवस दुपारनंतर उष्णतेची तीव्रता चांगलीच वाढत असताना त्यातच ढगाळ झालेले वातावरण यामुळे शेतकरी पाऊस पडण्याच्या आशेने ढगाकडे पाहत होता. सायंकाळी सहा वाजता जोराचा वारा सुरु झाला व काही वेळातच धो धो पाऊस पडू लागला. आज अचानकच  पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेकांची धांदल उडाली.पाऊस सुरु झाल्यानंतर काही ठिकाणी शेतकऱ्यांना जनावरांचा चारा, धान्य झाकण्यासाठी तर अनेकांना घररावर कागद, ताडपत्री टाकण्यासाठी धावपळ करावी लागली. परंतु अनेक दिवसांपासून पाण्याची टंचाई सुरु असल्यामुळे शेतकऱ्यांना पिके जगविणे व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था झालेली होती. कित्येक ठिकाणची पिके जळून जाण्याच्या मार्गावर आलेली होती.अचानक सुरु झालेल्या पावसाने काही प्रमाणात पिकांना दिलासा मिळाला असल्यामुळे शिक्रापुर सह परीसरातील जातेगाव, कासारी, पिंपळे जगताप येथील शेतकरी आनंदित झाले असून अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

आज सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले असल्याचे दिसून आले. शिक्रापुर येथे वादळी वारा व पाऊस सुरु झाला असताना अचानक शिक्रापुर-तळेगाव ढमढेरे रोडवर मोठे झाड कोसळल्यामुळे त्या झाडाखाली तीन दुचाक्या सापडल्याने मोठे  नुकसान झाले तर शेजारी असलेल्या काही दुचाक्या बचावल्या. सुदैवाने या झाडाशेजारी असलेल्या वैष्णवी हॉटेल वर झाड पडता पडता वाचले.

त्यामुळे त्याखाली आडोशाला उभे असलेल्या लोकांना कोणतीही जिवीतहानी झाली नाही असे यावेळी येथे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच सदर रस्ता रहदारीचा असल्याने नेहमीच वाहने वा प्रवाशांची वर्दळ येथे असते परंतु पाऊस सुरु असल्याने रस्ता मोकळा होता म्हणून पुढिल अनर्थ टळला गेला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या