आरोपींना फाशीची शिक्षा झाली याचं समाधान: लंघे (Video)

करडे,ता.१९ अॉगस्ट २०१७(सतीश केदारी) : संगणक अभियंता नयना पुजारी सामुहिक बलात्कार आणि खुन प्रकरणातील आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा न्यायालयाने सुनावली याचं समाधान असल्याच्या भावना प्रकाश लंघे यांनी संकेतस्थळ www.shirurtaluka.com शी दिलेल्या मुलाखतीत बोलताना व्यक्त केल्या.


 
मुळचे करडे गावचे सुपुत्र आणि सध्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे कार्यरत असणारे पोलीस हवालदार प्रकाश लंघे यांना नुकतेच  राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कार जाहीर झाला आहे.२००७ मध्ये महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नयना पुजारी हत्याकांडात लंघे यांनी पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत महत्वाची भूमिका बजावली. या खटल्यातील तपासी अधिकारी दीपक सावंत यांच्यासोबत रायटर म्हणून काम करताना घटनेचा पंचनामा करणे, साक्षीदारांचे जबाब नोंदवणे, यांसह आरोपींच्या अटकेपासून ते त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचवण्यात त्यांनी त्यांची प्रशासकीय जबाबदारी चोखपणे पार पाडली. त्यांच्या याच कामाची दखल घेवून नुकताच त्यांना पोलीस दलातर्फे 'उत्तम सेवा प्रदान तिकीट' पुरस्कारही प्राप्त झाला होता. येरवडा, पिंपरी चिंचवड येथे कार्यरत असताना अनेक दरोडे आणि बलात्काराच्या प्रकरणांचा छडा लावण्यातही त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

राष्ट्रपती पदक जाहिर झाल्यानंतर त्यांच्याशी थेट हितगुज केला असता त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या व पोलीस दलाविषयी आदराच्या भावना व्यक्त केल्या.

प्रश्न :तुमचा पोलीस दलात प्रवास कसा सुरु झाला?
पोलीस दलाविषयी सुरुवातीपासुनच आकर्षण होते.०७/०४/१९८६ ला पोलीस दलात भरती झाल्यानंतर पहिले पोस्टिंग हे पुण्यात पिंपरी पोलीस स्टेशन ला झाले.त्या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल म्हणुन रुजु झालो.त्या ठिकाणी प्रथमच कामाची चुणुक दाखविल्याने गुणवंत पोलीस कर्मचारी म्हणुन प्रथमच गौरव करण्यात आला होता.आयुष्यात पहिल्यांदा झालेल्या सन्मानाने कामास अधिक हुरुप मिळाला होता.तो पहिला क्षण आजही स्मरणात आहे.

प्रश्न :पोलीस दलात सेवा कोठे कोठे झाली ?

पोलीस दलात सर्वाधिक सेवा ही पुणे शहरातच झाली.यात पिंपरी पोलीस स्टेशन, वाहतुक शाखा, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, विशेष गुन्हे शाखा, क्राइम ब्रांच(पुणे शहर),येरवडा पोलीस स्टेशन येथे सेवा केली.या सेवेदरम्यान उत्कृष्ट सेवा बजावल्याने आजतागायत सुमारे २१५ विविध बक्षिसे पोचपावती म्हणुन मिळाली आहेत.

प्रश्न :नयना पुजारी खुन खटल्याविषयी काय सांगाल ?

नयना पुजारी खुन खटला हा तसा अतिशय दुर्मिळातला दुर्मिळ समजला जाणारा खुन खटला.या गुन्हयांत गुन्हेगारांची निर्दयीपणा, क्रुरता, अन भिषणता समोर येते.गुन्हा घडल्यानंतर मिसिंग म्हणुन तक्रार दाखल झाली.त्या वेळेस कोणतातरी सण सुरु होता.सर्वांची धावपळ सुरु होती.पण इतर सहका-यांसह गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिका-यांनी बारकाइने लक्ष घातले अन  यातील गांभिर्य समोर अाले.अन या गुन्हयाचा तपास सुरु झाला.

प्रश्न : बहुचर्चित या गुन्हयाचा तपास कसा लावला ?

या खुनात गुन्हेगारांनी क्रौर्याची परिसिमा गाठली होती.अतिशय थंड डोक्याने रचलेला हा एकप्रकारे कटच होता.अारोपींनी संगणक अभियंता नयना पुजारी हिला गाडीत बसवुन अपहरण केले.त्यानंतर तिच्या खात्यातील पैसे लुटले.त्यानंतर अारोपींनी सामुदायिक बलात्कार केला.एवढ्यावरच अारोपींनी न थांबता खुन करत संपुर्ण शरीर छिन्न विछिन्न करुन टाकले होते.या वेळी खुनाचा कोणताच पुरावा घटनास्थळी ठेवलेला नव्हता.या घटनेत ना ठोस पुरावे ना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार.त्यामुळे या गुन्हयात क्लिष्टता होतीच पण प्रकरण गुंतागुंतीचे असल्याने प्रचंड दबाव होता.तपास अधिका-यांसह सर्वांनाच एक आव्हाण होते.त्यामुळे तत्कालीन तपासी अधिकारी दीपक सावंत यांच्यासोबत काम करताना रायटर म्हणुन कागदपञांसह इतर सर्वच जबाबदारी माझ्याकडे होती.या पोलीस तपासात महत्वाची भुमिका ठरली ती इतर सहका-यांची.अतिशय बारकाइने अभ्यास करत तांञिकदृष्ट्या माहिती गोळा करत आरोपींपर्यंत पोहोचता आले.घटना घडल्यानंतर ते आरोपींना फाशी सुनावणेपर्यंत सुमारे ६ ते ७ वर्षांचा कालखंड गेला.दरम्यान च्या काळात सुमारे ३३ च्या वर साक्षीदार उभे करण्यात यश आले.या ही सर्व साक्षीदारांनी पोलीस खात्याला प्रामाणिक मदत केली व शेवटपर्यंत ठाम राहिले.व अॅड. हर्षद निंबाळकर यांच्या सारखे अत्यंत निष्णात व हुशार वकिल यांनीही तितक्याच तोलामोलाची भुमिका बजावली.खटला न्यायालयात चालेपर्यंत अनेक  तपासी अधिकारी बदलले.पण मी सुरुवातीपासुन ते शेवटपर्यंत केवळ एकमेव म्हणुन अधिकारी म्हनुन काम केले.

प्रश्न : दैनंदिन कामकाज अन ही केस कशी हाताळली ?
पुणे शहरात काम करायचे म्हटले कि दिवसभरात पोलीस स्टेशनला विविध प्रकारचे गुन्हे दाखल व्हायचे.त्यामुळे बलात्कार, खुन, दरोडे, मारामा-या या गुन्ह्यांचा ही तपास करावा लागायचा.इतर कामेही करावा लागत होती.त्यामुळे काम करताना अक्षरश: तारेवरची कसरत करावा लागत असे.या गुन्हयांत सुरुवातीपासुन गांभिर्य असल्याने बहुतांश अधिकारी असल्याने व यातील बारकावे लक्षात आल्याने शेवटपर्यंत संपुर्ण जबाबदारी माझ्यावरच होती.त्यामुळे तडाला लावायचीच हा निश्चय केलेला. पोलीस स्टेशन च्या दैनंदिन गुन्हयाचा निपटारा करत असताना या गुन्हयांच्या बारीक सारीक माहिती गोळा करण्यासाठी मी निवांत वेळ शोधायचा प्रयत्न करायचो.त्यात माहिती गोळा करणे, साक्षीदार तयार करणे, व इतर कामे चालायची.यातील कागदपञे तयार करण्यासाठी राञराञ जागायचो.व पुन्हा सकाळी वेळेवर कामावर हजर हा असायचो.या कालावधीत पोलीस स्टेशन च्या इतर सहका-यांनी,कुटुंबाने व वरिष्ठांनीही मोलाची साथ दिली.त्यामुळे कितीतरी कागदांची कपाटे या केसच्या फायलींनी भरली.जेव्हा जेव्हा मनाला काही चुकत  आहे असे  वाटे तेव्हा बनवलेली कागदे फाडत असे.व अचुक फायली बनविण्यात आल्या.न्यायालयासमोर घटनेचे प्रत्यक्षदर्शी नसतानाही अचुक तपास लावल्याने जास्तीत जास्त साक्षीदार उभे केले गेले.सर्व शेवटपर्यंत ठाम राहिले व अखेर न्याय  मिळुन खुन, बलात्कार या गुन्हयांच्या कलमांखाली न्यायालयाने तीन आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.अशा  प्रकारे क्लिष्ट असलेल्या व गुन्हयात यश मिळविता आले परंतु या कालावधीत ञासही खुप सहन करावा लागला.

प्रश्न : तुमचा सर्वात वाइट अनुभव कोणता ?
एकदा राजस्थानला चोरीच्या मालाच्या तपासासाठी सहका-यांसमवेत गेलेलो असताना बिकट प्रसंगाला सामोरे जावे लागले.त्या ठिकाणी तेथील गावातील लोकांकडुन हल्ल्याचा प्रयत्न होणार असल्याचे लक्षात आले होते.त्यावेळी पोलीस स्टेशनही बरेचसे दुर होते.गाडीत सुमारे दोन ते तीन टन माल होता. फिर्यादी अन सोबत तीन पोलीस असताना माल घटनास्थळापासुन पोलीस स्टेशनपर्यंत नेणे अन तेही राञीच्या सुमारास हे आव्हान होते.त्यावेळी सहका-यांनी एका गाडीतला दोन ते तीन टन माल दुस-या गाडीत टाकत पोलीस स्टेशनपर्यंत नेला.त्यावेळेसचा प्रसंग हा अंगावर शहारे आणणारा होता.

प्रश्न :पोलीस दलाविषयी काय सांगाल ?

अनेकदा बढत्यांविषयी मला बोलण्यात येते.परिक्षा द्या असेही सांगण्यात येते परंतु पदापेक्षा प्रामाणिक काम करणे हेच अधिकचे सोयीचे वाटते.त्यामुळे अधिक आशा मनात कधीच बाळगली.कोणतंही काम करा, निष्ठेने काम करा, त्यात तुम्हांला यश येतेच.पोलीस खात्यांत प्रामाणिक काम केलेच तर तुम्हांला मनाला सुख मिळतेच.परंतु जनतेचेही तुम्हांला तितकेच प्रेम, सहयोग मिळतो.पोलीस खाते प्रामाणिक काम करणा-याला कधीना कधी न्याय देतेच असे मला वाटते.

प्रश्न : राष्ट्रपती पदक जाहिर झाल्यानंतर तुम्हांला काय वाटते?
पोलीस खात्यात भरती झाल्यानंतर प्रामाणिक काम व निष्ठा मनात ठेवुनच वाटचाल सुरु केली होती.पदाच्या बक्षिसांच्या आमिषाने कधीच काम केले नाही.त्यामुळे मनाला आजवर केलेल्या कामाचे समाधान लाभते. नयना पुजारीला न्याय देता आला याचाही विशेष अभिमान आहेच. राष्ट्रपती पदक जाहिर झाल्याच्या निमित्ताने मिळालेली हि प्रामाणिक पोचपावती असुन या यशात कुटुंबाचा, सर्व सहका-यांचा, वरिष्ठांचा, गावाचा खारीचा वाटा आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या