गुटखाविक्री करणा-या बडया धेंड्यांवर कारवाई करणार?

शिरुर, ता. २२ सप्टेंबर २०१७ (सतीश केदारी) : शिरुर शहर व तालुक्यात बेकायदेशीररित्या गुटखा विक्री करणा-यांवर  कारवाई करण्यास प्रशासकीय यंत्रणा हतबल असल्याचे दिसुन येत असुन या बेकायदा गुटखा विक्रीस कोणाचा वरदहस्त आहे याबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा  आहे.

याबाबत नागरिक आजही अनभिज्ञ आहेत.शिरुर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रित्या गुटखा विक्री होत असुन आज राज्यात बंदी असतानाही सर्रासपणे याची विक्री होत आहे.गावपातळीवर पानाच्या टपरीपासुन ते किराणा दुकानापर्यंत तसेच शहरात गल्लोगल्ली,कोपरा-कोप-यावर, नाका-नाक्यांवर हा गुटखा सहज उपलब्ध होतो.त्यामुळे गुटख्यावर बंदी आहे कि नाही ? मग बंदी चा फार्स कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो.इतक्या सहजपणे गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ सहजपणे उपलब्ध होत  असल्याने या मागे मोठे अर्थकारण असुन गुटखाबंदी असतानाही अशा अवैध विक्रेत्यांची माहिती अन्न व औषध विभाग व पोलीस प्रशासनाला माहितच नाही कि याचं गांभिर्य या विभागाला नाही असा सवाल व्यक्त केला जात आहे.

राज्यात गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांवर निर्बंध असुन राजरोसपणे होत असलेल्या विक्रीमुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडत आहे.माञ या गोष्टीकडे संबंधित विभाग पुर्णपणे दुर्लक्ष करत असुन या गुटखा विक्रीच्या बड्या धेंड्यावर खरंच कारवाई कोण करेल का असाही सवाल होत आहे.शिरुर तालुक्यात सर्वात मोठी पंचारांकित औद्योगिक वसाहत म्हणुन रांजणगाव गणपती एमआयडीसी ही ओळखली जाते.या भागात सर्वात जास्त परप्रांतिय कामगारांची वर्दळ असते.त्याचप्रमाणे सणसवाडी, शिक्रापुर या भागातही मोठ्या प्रमाणावर नागरिकिरण झाले असल्याने या भागासह छोटया-मोठ्या गावांत इतकेच काय वाड्या-वस्त्यांवरील छोट्या-मोठ्या टप-यांमधुन राजरोसपणे गुटखा विक्री होत असताना कडक कायद्याचे अंमलबजावणी करणारे प्रशासनच या गंभीर मुद्द्याकडे जाणिवपुर्वक डोळेझाक करत आहे.

शिरुर तालुक्यात शहरीकरण,पंचतारांकित वसाहत अन मोठी बाजारपेठ यामुळे या तालुक्यात परराज्यांतुन गुटखा विक्रीसाठी येत असुन त्याचे मोठ-मोठे विक्रेत्यांकडुन हा गुटखा तालुक्यात प्रत्येक गावापर्यंत सहजपणे पोहोचविला जातो.या गुटखामाफियांची एकप्रकारे मोठी साखळीच निर्माण झालेली आहे.हे सर्व विक्रेते गुटखा व अशा तंबाखुजन्य पदार्थांची मोठ्याप्रमाणावर साठा करत असुन या सर्व गोष्टी प्रशासनाला माहित नाही काय ? असा प्रश्न नागरिकांमधुन उपस्थित केला जात आहे.राज्यशासनाने ज्या उद्देशाने गुटखाविक्रीवर निर्बंध घातले,त्या मुळ उद्देशालाच संबंधित विभाग व प्रशासनाने हरताळ फासला आहे. अवैध गुटखाविक्री करणा-या माफियांकडुन,प्रशासनाने मुक संमतीदिल्याप्रमाणे आमच्यावर कोणीच कारवाई करु शकत नाही या अविर्भावात गुटखामाफिया वावरत आहेत.राज्यात सर्वञ गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांवर बंदी असताना बहुतांश शासकिय कार्यालयातील कर्मचारीच खुलेआम नागरिकांसमोर गुटखा खाताना व तंबाखुजन्य पदार्थ चघळत असल्याचे दिसत असल्याने कायद्याचे रक्षण करणा-यांकडुनच कायद्याची पायमल्ली होत असल्याचे चिञ शहर व तालुक्यात पहावयास मिळत असल्याने याच अधिका-यांकडुन बंदीची अपेक्षा कशी ठेवायची ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

शिरुर शहरातील अनेक शासकिय कार्यालय परिसरात गुटखा बंदी असताना शासकिय कार्यालयात भिंती, कोप-या-कोप-यात पिचका-या मारुन  मोठ्या प्रमाणावर घाण केली जात आहे.शिरुर शहर व परिसरात अनेक विक्रेते अवैधरित्या गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांचा साठा करत असुन गुटखा विक्रीने थैमान घातले आहे.यांवर कोण अंकुश घालणार ?या विक्रेत्यांवर कधी कारवाई होणार याकडे शहरासह तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले असुन जर खरेच बंदी करायची असेल तर बेकायदेशीर गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणा-या बड्या धेंड्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी आग्रही मागणी नागरिकांमधुन होत आहे

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या