निमोणेत झाडाला गळफास घेउन शेतक-याची आत्महत्या

निमोणे,ता.५ अॉक्टोबर २०१७(प्रतिनीधी) : निमोणे येथील दुर्गेवस्ती नजीक तुकाराम उर्फ नानाभाऊ मनोहर दोरगे या शेतकऱ्याने शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.गेल्या दोन महिन्यात आत्महत्येची या गावातील ही दुसरी घटना आहे.


यासंदर्भात शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रविण बाबुराव दोरगे यांनी फिर्याद दिली आहे.मयत तुकाराम उर्फ नानाभाऊ मनोहर दोरगे हे फिर्यादीच्या घराजवळ आपल्या कुटुंबासमवेत राहतात. बुधवार (दि.४) रोजी सकाळी ६.३०च्या दरम्यान फिर्यादी प्रविण यांना आपल्या घरासमोरील लिंबाच्या झाडाला कोणीतरी फास घेऊन लटकत असल्याचे दिसले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता आपले चुलते तुकाराम उर्फ नानाभाऊ मनोहर दोरगे ( वय-६५) हे गळफास घेतल्याने मृत झालेल्या अवस्थेत लटकताना दिसले. त्यानुसार त्यांनी शिरूर पोलिस स्टेशनला खबर दिली असता, सदर घटनेचा शिरूर पोलिसांकडुन पंचनामा केला. त्यावेळी त्यांच्या खिशात आढळून आलेल्या चिट्टीमध्ये सहकारी सोसायटी, खासगी व्यक्तींचे कर्ज तसेच किडणी आणि मुतखडयाच्या आजाराने आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. पुढील कायदेशीर पुर्तता करण्यात आल्यानंतर उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिरूर पोलिस स्टेशनचे पी.आय. राजेंद्र कुंटे यांचे मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार अविनाश गायकवाड अधिक तपास करत आहेत.

मयत तुकाराम उर्फ नानाभाऊ मनोहर दोरगे पंचक्रोशीत एक कसलेले मल्ल आणि वस्ताद म्हणुन प्रसिद्ध होते. त्यांनी लाल मातीत अनेक मल्ल घडविले. एवढा कणखर माणसाचा शेवट असा विदारक झाल्याने पंचक्रोशी तसेच कुस्ती क्षेत्रातील सर्व मंडळी हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली असा मोठा परिवार आहे.
 
दरम्यान याच वस्तीवर गत दोन महिन्यांपूर्वी माणिक दुर्गे या युवा शेतकऱ्याने अशीच आपली जीवनयात्रा संपविली होती. त्यामुळे निमोणे गावामधील आत्महत्यांच्या सत्राचा 'सिलसिला ' काही संपता -संपत नाही. अलिकडच्या दोन वर्षात किमान १५-१६ जणांनी आत्महत्यांचा मार्ग स्विकारल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या भागात व्यापक प्रबोधनाची गरज आहे.

शासनाने देऊ केलेल्या कर्जमाफीचे घोंगडे अजुनही भिजतच आहे. घोषणा करुनही अदयाप शेतकऱ्यांच्या पदरात 'दमडी' ही न पडल्याने शेतकरी नाईलाजाने असे टोकाचे पाऊल उचलत आहेत. शेतकरी असा संपत चालला तर कर्जमाफी देणार तरी कोणाला असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या