श्रीक्षेत्र विठ्ठलवाडीतील भिमा नदीवरील बंधाऱ्यावरून पाणी

तळेगाव ढमढेरे, ता. 13 ऑक्टोबर 2017 (जालिंदर आदक): श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथील भिमा नदीवरील बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले असून, पूलावरून पाणी वाहत असताना नागरिक जीव धोक्यात टाकून वाहतूक करत आहेत. पश्चिम पट्ट्यामध्ये सलग दोन दिवस चालू मुसळधार पावसामुळे नद्यांना पुर आले असून, ओढे नाले तुडुंब झाले आहेत. नदीकाठी असणाऱ्या गावांना दक्षेतेचा इशारा देण्यात आला आहे.

 
रविवार पासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे सलग तीन दिवसात वेळ नदीसह अनेक ओढे नाले भिमा नदीला मिळाले असून, भामाआसखेड आणि चासकमान धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने या धरणाचे पाणी खेड मार्गाने भिमा नदीला मिळाले आहे. गुरुवारी (ता. 12) दिवसभर दुधडी भरून वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यावर्षी पाऊस चांगला पडला असल्यामुळे महाराष्ट्रातील मोठी धरणे १०० टक्के भरत आलेली आहेत पाण्याची पातळी वाढली असून नद्यांना पुराचे स्वरूप आले आहे. भामाआसखेड आणि चासकमान धरणांच्या पाण्याचा धोका लक्षात घेता काही दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने आज सकाळपासूनच भिमा नदीवरील पाण्याचे वाढते प्रमाण आहे.

नदीकाठच्या लगतच्या काही गावांचा संपर्क तुटल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले तर विठ्ठलवाडी येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेला पाठेठाण, सांगवी सांडस येथून येणाऱ्या विध्यार्थ्यांना नदीच्या पाण्यामुळे गुरुवारी शाळेत येता आले नाही. अनेकांनी दूर अंतरावरून येणे पसंत केले. परंतु, अनेकांना वेळेत पोहाचताच आले नसल्याने कामगार वर्गास सुट्टी काढावी लागल्यामुळे भुर्दंड बसला आहे. काही दुचाकी जीव धोक्यात घालून बंधाऱ्यावरून ये-जा करत होते. बंधाऱ्याच्या ठिकाणी सुरक्षेसाठी कर्मचारीवर्ग नसल्याने धोका पत्कारून काही लोक जीव धोक्यात घालून प्रवास करताना पहावयास मिळत होते. मात्र, गेल्या तीन दिवसापूर्वी झालेल्या पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या घटना अजून ताज्या असताना येथील नागरिक गांभीर्याने घेत नसल्यामुळे मोठ्या घटनेला सामोरे जाण्याची शक्यता आहे.

चासकमान धरणाच्या सांडव्यातून मोठे गेट द्वारे सुमारे साडेसहा हजार कयुसेक्स ने बुधवारी रात्री सोडलेले पाणी गुरुवारी सकाळी अकराला बंद केले. भामा आसखेड धरणातून २१०० क्यूसेक्स ने बुधवारी सायंकाळी पाच वाजता सोडलेले अद्यापही चालू ठेवण्यात आलेले आहे. चासकमान धरणातून पॉवर हाऊसच्या गेटमधून ८५० क्यूसेक्स ने विसर्ग चालू आहे. मध्य महाराष्ट्रात १४ तारखेपर्यंत अतिवृष्टी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. गुरुवारी दोन्ही धरणावर पाऊस चालू नसल्याने विसर्ग वाढण्याची शक्यता कमी आहे. तरीही धरणाच्या पातळीची पूर्ण संचय पातळी खाली जाण्यास सुरुवात झाल्यानंतरच सांडव्यावरून सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात येईल.
- जे.डी.संकपाळ, शाखाधिकारी, पाटबंधारे विभाग कोंढापुरी.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या