कोरेगाव भीमात दंगल; तणाव निवळला; शांततेचे आवाहन

कोरेगाव भीमा, ता. 2 जानेवारी 2018: कोरेगाव भीमा येथे सोमवारी (ता. 1) झालेल्या दंगलीनंतर पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणल्याने तणाव आज (मंगळवार) निवळला आहे. पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे.

विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.1) सकाळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते कोरेगाव भीमा येथे समोरासमोर आले व घोषणाबाजी होऊन वाद चिघळला. त्याचे पर्यवसान दगडफेक, वाहने व मालमत्तेच्या जाळपोळीत झाले. पुणे-नगर रस्त्यावर कोरेगाव भीमा, वढू रस्ता, सणसवाडी, शिक्रापूर तसेच कोंढापुरी येथे अनेक वाहनांची तसेच रस्त्यावरील दुकानांची तोडफोड व जाळपोळ झाली. या घटनेत एक जण ठार, दोन जण गंभीर जखमी, तर काही जण किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणल्याने तणाव आज (मंगळवार) निवळला आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे सकाळी संभाजी महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी दोन गटांचे कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणा देण्यात आल्या. वढू बुद्रुक ग्रामस्थांनी दर्शनानंतर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना माघारी पाठविले; मात्र कोरेगाव भीमा येथे पुन्हा हे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन समोरासमोर आले व सकाळी साडेअकरा वाजता दंगल सुरू झाली. दंगलखोरांनी वाहनांची जाळपोळ केली. शिवाय, रस्त्यालगतच्या दुकानांची व वाहनांची तोडफोड केली. सुमारे तीन-चार तास हा प्रकार सुरू होता. या घटनेचे पडसाद वढू रस्ता, सणसवाडी, शिक्रापूरपर्यंत उमटले. डोक्‍यात दगड मारल्याने सणसवाडीत एका तरुणाचा मृत्यू झाला, तर कोरेगावात दोघे जखमी झाले. राहुल फटांगळे (वय 28) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे.

स्थानिक ग्रामस्थांना याची मोठी झळ बसली. पोलिस अधीक्षक सुवेझ हक सायंकाळी उशिरापर्यंत स्वतः परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत होते; चारचाकी व दुचाकी वाहने पेटवल्यामुळे दूरवरून धुराचे लोट दिसत होते. त्यामुळे नेमके काय घडले आहे. सोशल मिडियावरून अनेकजण व्हिडिओ व छायाचित्रे व्हॉयरल करत होते. परंतु, काही काळानंतर अफवा थांबल्या गेल्या. पोलिसांनी अखेर दुपारी तीनच्या सुमारास अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून लाठीमार करत जमावाला पांगवले व पुणे- नगर महामार्ग मोकळा केला.

कोरेगाव भीमा लढाईच्या द्विशताब्दीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विजयस्तंभ स्थळी अभिवादनाचा मोठा कार्यक्रम होत असतानाच कोरेगाव भीमा परिसरात झालेल्या या दंगलीमुळे कार्यक्रमाला गालबोट लागले. या तणावामुळे नगर रस्त्यावरील सर्व दुकाने बंद ठेवली होती.

वढु बुद्रुक येथे दिवसभर शांतता..

वढु बुद्रुक येथे सोमवारी दिवसभर शांतता राहिली. अगदी काही अंतरावर कोरेगाव-भिमात दंगल उसळली असताना वढु बुद्रुकमध्ये समाधी दर्शनाला येणा-यांची संख्या कमी राहिली. मात्र अनेक अफवा वारंवार उठत असल्याने संपूर्ण गाव तणावाखाली होते.

बाजारपेठ बंद..

शिक्रापूरात काही तरुणांनी पुढाकार घेत बाजारपेठ बंद पाडली. औरंगाबाद-मराठवाडा भागातून कोरेगाव-भिमाच्या दिशेने जाणारी वाहतूकही शिक्रापूरात थांबून-थांबून पुढे सोडणे चालू असतानाच येथील मलठण फाट्यावर दोन बसेची तोडफोड केल्याने शिक्रापूरात काही काळ तणाव वाढला होता. दरम्यान दुपारनंतर कोरेगाव-भिमाकडे जाणारी अनेक वाहने परत फिरल्याचे चित्र होते. संध्याकाळच्या सुमारास मात्र हा तणाव ब-यापैकी निवळला.

अफवा पसरवू नका...
सोशल मिडियावरून व्हायरल होत असलेले व्हिडिओ व छायाचित्रांवर विश्वास ठेवू नका. शिवाय, कोणत्याही अफवा पसरवू नका. पोलिसांना सहकार्य करा. पोलिसांनी शांतेतेचे आवाहन केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या