कोरेगाव भीमा येथील परिस्थिती नियंत्रणात; जमावबंदी लागू

कोरेगाव भीमा, ता. 3 जानेवारी 2018 : कोरेगाव भीमा येथे दंगलीमुळे संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक उसळू नये, यासाठी पोलिसांनी कोरेगाव परिसरात जमावबंदीचा आदेश लागू केला असून, आज (बुधवार) परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे सोमवारी (ता. 1) उसळलेल्या दंगलीत सुमारे दीड कोटीचे तर सणसवाडी परिसरात सुमारे 90 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, वरिष्ठ पोलिस अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींनीही पेरणेफाटा, कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक येथे भेटी देऊन स्थानिकांशी संवाद साधत आहेत. या घटनेतील दोषींवर कारवाई तसेच मृताच्या कुटुंबीयांना व जखमीस तसेच नुकसानग्रस्तांना मदतीचे आश्वासनही दिले.

आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार ऍड. अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, यांच्यासह स्थानिक व लोकप्रतिनिधींनी कोरेगाव भीमा व परिसरात भेट देऊन स्थानिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. गृहराज्यमंत्री केसरकर, पोलिस महासंचालक (कायदा सुव्यवस्था) बिपिन शर्मा, पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलिस अधीक्षक सुवेझ हक तसेच आमदार पाचर्णे व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही पेरणेफाटा येथे विजयस्तंभ तसेच वढू बुद्रुक येथे दोन्ही समाधिस्थळी भेटी देऊन स्थानिकांशी संवाद साधला. या वेळी घटनेतील दोषींवर पुराव्यांच्या आधारे कारवाई तसेच सणसवाडी येथील घटनेत मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगडे यांच्या कुटुंबीयांस व जखमींना योग्य ती मदत तसेच विमासंरक्षण नसलेल्या नुकसानग्रस्तांना शक्‍य ती मदत देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
दरम्यान, शिक्रापूर पोलिसांनी कोरेगावातील दंगल, मारामारी जाळपोळींच्या गुन्ह्यात 11 जणांसह इतर 1100 ते 1400 जणांविरुद्ध तर सणसवाडी येथील घटनेत राहुल बाबाजी फटांगडे या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दंगल, मारामारी जाळपोळीच्या गुन्ह्यात 250 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी सांगितले. सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली असून कोरेगाव, वढू, सणसवाडी येथील दुकाने, शाळा, बॅंका तसेच कारखानेही बंद असून नगर हमरस्त्यावरील वाहतूक मात्र सुरळीतपणे सुरू आहे.

शिरूरला मोर्चा, दुकाने बंद
शिरूरः कोरेगाव भीमा येथील जातीय दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी येथील विविध संघटनांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा देत पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. मोर्चादरम्यान शहरातील दुकाने बंद झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. दरम्यान, सकाळी विविध अफवांमुळे शहरात अचानक तणावाची स्थिती निर्माण झाल्याने बाहेरून अधिकची पोलिस कुमक मागविण्यात आली. शहरातील मुख्य परिसरात दिवसभर पोलिस पथके तैनात असल्याने वातावरणात तणाव कायम होता. आज परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणाखाली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या