पुणे-नगर महामार्गावर धोकादायकरित्या ऊस वाहतूक

शिक्रापूर, ता. 31 जानेवारी 2018 (एन. बी. मुल्ला): पुणे-नगर महामार्गासह शिक्रापूर-चाकण मार्गावर, शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर तसेच शिक्रापूर-जातेगाव रस्त्यावर मोठया प्रमाणात ट्रॅक्टर ट्रेलरच्या सहाय्याने धोकादायकरित्या ऊस वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.


सध्या साखर कारखाने व गुर्हाळे सुरू असल्याने ऊस तोडणी मोठया प्रमाणात सुरू आहे. ऊसाची वाहतुक बैलगाडया, ट्रॅक्टर ट्रेलर व ट्रक मधून होत आहे. मात्र, ट्रेलरच्या सहाय्याने ऊसाची सर्वाधिक वाहतूक होताना दिसत आहे. पुणे-नगर महामार्गावर व शिक्रापूर-चाकण मार्गावर मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यात या ऊसाच्या ट्रेलरची भर पडली आहे.

ट्रॅक्टरला तीन ट्रेलर जोडलेले असतात तसेच प्रमाणापेक्षा जास्त ऊस भरलेला असतो, त्यामुळे झोल जावून ट्रेलर पलटी होण्याच्या घटना घडत आहेत. शिवाय, मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दुचाकीस्वारांना तर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, कारण रस्त्यावर ठिकठिकाणी ऊस व ऊसाच्या मोळया पडलेल्या असल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढत आहे. दिवसरात्र ऊसाची अशी धोकादायक वाहतूक सुरू असून ट्रेलरला मागील बाजूस रिफ्लेक्टरही नसल्याने रात्रीच्यावेळेस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. बहुतांशी नवीन ट्रेलरला नंबरच नाहीत. तसेच हे ट्रॅक्टर चालकही टेपरेकॉर्डर लावून व आवाज वाढवून बेदरकारपणे ट्रॅक्टर चालविताना आढळतात. ऊस वाहतुक करणाऱया ट्रॅक्टर चालकांना नियमावली करून देवून, त्यांची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या