विद्यार्थ्यांनो...परीक्षेला तणावविरहीत सामोरे जा- प्रविण तांबे

जातेगाव बुद्रुक, ता.८ फेब्रुवारी २०१८ (प्रा.एन.बी.मुल्ला) : गुणांच्या  बेरेजेपेक्षा प्रयत्न आणि पात्रता महत्वाची आहे. स्वतःचे मनोबल उंचाविण्यासाठी आत्मविश्वास गरजेचा असून तो टिकवून भयमुक्त वातावरण व तणावरहीत विचारांनी परीक्षेला सामोरे जा  असे आवाहन पोलीस उपअधिक्षक प्रविण तांबे यांनी केले.


जातेगांव बुद्रुक (ता. शिरूर) येथील श्री. संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभप्रसंगी विद्यार्थाना मार्गदर्शन करताना तांबे बोलत होते. याप्रसंगी घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश पवार, संस्थेचे संचालक दत्तात्रय उमाप, साहेबराव उमाप, प्राचार्य रामदास थिटे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रकाश पवार म्हणाले की १०वी व १२वी परीक्षा हा शिक्षण प्रवासातील महत्वाचा वळण टप्पा असून मुलांनी प्रचंड मेहनत व सातत्याने अभ्यास करणे महत्वाचे आहे. आपल्या पालकांचे स्वप्न साकार करण्यासाठी याच वयात जिद्दीने यशाची वाटचाल करणे आवश्यक आहे . प्रास्ताविकात प्राचार्य थिटे म्हणाले की दहावी -बारावी परीक्षा भविष्यकालीन जीवनाची दिशा ठरवत असते. वडीलधाऱ्यांचे संगोपन, शिक्षकांचे संस्करण आणि विद्यार्थ्यांचे अध्ययन या घटकांतूनच यश संपादन होते.

परीक्षा हे माध्यम असून साधनेतून यश संपादन होत असते. सर्वोत्तम ध्येय प्राप्तीसाठी सतत प्रयत्नशील रहाण्याचे आ़वाहनही यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गणेश बांगर यांनी केले तर प्रा. मनोहर भिसे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या