पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादाने अवैध धंदे जोरात?

शिरूर, ता.१० मार्च २०१८ (धर्मा मैड) : शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत  पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारेगाव, ढोकसांगवी, रांजणगाव व परिसरातील गावांमध्ये पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादाने बेकायदा दारू, मटका, जुगार व गुटखा विक्री राजरोसपणे जोरात सुरू असून, अशा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये बोकाळलेला अवैध धंद्याला लगाम कोण घालणार? याबाबत या परिसरातील नागरिक चिंता व्यक्त करीत आहे.

पुणे-अहमदनगर मार्गावरील ही पंचतारांकित औद्योगिक वसाहत असून या वसाहतीत अनेक नामवंत कंपन्या आल्याने या भागात त्यामुळे मोठय़ा प्रमाणात कारखानदारी  वाढली. या वाढलेल्या  कारखानदारीमुळे परिसरातील रांजणगाव, कारेगाव, या प्रमुख गावांसह ढोकसांगवी, सोनेसांगवी व परिसरातील गावांमध्ये मोठ्या  प्रमाणात  नागरीवस्ती वाढून परप्रांतिय नागरिकांसह, राज्यातील अनेक भागातील नागरिक या परिसरात स्थिरावले. या परिसरात  वाढलेल्या नागरीवस्ती मुळे मोठ्या प्रमाणात  या गावांची  आर्थिक  उन्नती झाली. अशा आर्थिक सुबत्ता आलेल्या या भागात सद्य परिस्थितीत पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जुगार, मटका, दारू व बेकायदा गुटखा विक्री या सारख्या अवैध धंद्याला ऊत आला आहे.  औद्योगिक वसाहतीत व महामार्गावर असणाऱ्या हाॅटेल मध्ये  बेकायदेशीरपणे दारू विक्री होत आहे तर रांजणगाव व कारेगाव या गावांमध्ये जुगार मटक्याचे अड्डे चालू आहेत. अशा परिस्थितीत औद्योगिक वसाहतीत  कंपन्यांनी कामासाठी आपले घरदार सोडून कुटुंबाचे भवितव्य घडविण्यासाठी आलेला तरूण या व्यसनाच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होऊ लागला आहे.

औद्योगिक वसाहतीतील पोलिस ठाण्यातील स्थानिक पोलिस प्रशासनाशी अर्थ पुर्ण संबंध प्रस्थापित करून रांजणगाव औद्योगिक वसाहतीत  अशा  प्रकारचे अनेक  अवैध व्यवसाय जोरात सुरू  असल्याची चर्चा तालुक्यातील नागरिकांत आहे. भविष्यात औद्योगिकवसाहतीतील कारेगाव, रांजणगाव व परिसरातील गावांमध्ये चालणाऱ्या दारू, मटका, जुगार सारख्या अवैध धंद्याला पायबंद घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे व आपल्या देशाचे  भविष्य  असलेल्या तरूण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवावे अशी मागणी या परिसरातील जेष्ठ नागरिकांतून होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या