शिरूर तालुक्यातील गुन्हेगारी क्षेत्रातील विविध घडामोडी

विजेचा झटका बसून तरुणाचा मृत्यू
गुनाट, ता. 27 सप्टेंबर 2019:
विजेचा झटका बसून गुनाट (ता. शिरूर) येथील योगेश शिवाजी गव्हाणे (वय 24) या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. 26) सकाळी साडेसात वाजता जनावरांना चारा आणण्यासाठी योगेश शेतात गेला असता; शेतात उभ्या असलेल्या विजेच्या खांबाला त्याचा धक्का लागला. त्यातच रात्रभर पाऊस झाला असल्याने जमीनही ओलसर होती. अशा परिस्थितीत विजेचा प्रवाह खांबात उतरला असल्याने विजेचा जोराचा झटका योगेशला बसला. योगेशला तातडीने प्रथमोपचार करून न्हावरे येथील सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी त्यास मृत घोषित केले.

अहमदनगर-दौड महामार्गावर भीषण अपघातात चार ठार
नगर, ता. 26 सप्टेंबर 2019: नगर-दौड महामार्गावरील नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद परिसरात बुधवारी (ता. 25) रात्री अडीचच्या सुमारास ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात चौघे जण जागीच ठार झाले आहेत. नगर दौड महामार्गावरील बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्ती जवळ ट्रक (एमपी/09-एचएच/8378) व कार (एमएच/04-बिवाय/4857) भीषण अपघात झाला. अपघातात नगर जवळील भिंगारचे तीन तर नगर तालुक्यातील वाळकी येथील एकजण असल्याचे समजते. श्रीगोंद्याहून नगरकडे येत असताना हा अपघात झाला. अपघातात भिंगारचे तिघे जागीच ठार झाल्याने भिंगारवर शोककळा पसरली आहे.

शिक्रापूरमधील व्यक्ती बेपत्ता...
Image may contain: 1 person, closeupशिक्रापूर, ता. 3 ऑगस्ट 2019: येथील पस्तीस वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार भावाने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे दिली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील करंजेनगर येथे राहणारा कल्पेश वसंत दीक्षित ही व्यक्ती घरातून काही कामानिमित्ताने येरवडा येथे जात असल्याचे सांगून गेली, त्यांनतर ते पुन्हा घरी आले नाहीत. त्यांनतर त्याच्या घरच्यांनी आजूबाजूला सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतु, कल्पेश यांचा शोध लागला नाही. कल्पेश यांचा भाऊ निलेश वसंत दीक्षित (रा. करंजेनगर, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. बेपत्ता व्यक्तीचे वर्णन उंची पाच फुट पाच इंच, रंग गोरा, मजबूत बांधा, सरळ नाक, अंगात भगव्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅंट असे आहे. सदर व्यक्तीबाबत कोणासही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी ०२१३७२८६३३३ तसेच ९८५०५८६३३७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले आहे. पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अनिल जगताप हे पुढील तपास करत आहेत.

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला जाळण्याचा प्रयत्न
Image may contain: fire and night
शिरूर, ता. 3 ऑगस्ट 2019ः खंडाळे येथे चारित्र्याच्या संशयावरून रॉकेल ओतून पत्नीला जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (ता. 31) घडली. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी नीलेश जिजाबा नरवडे (रा. खंडाळे, ता. शिरूर) याला अटक केली आहे. पीडित तीस वर्षीय विवाहितेने याबाबत फिर्याद दिली. नीलेश नरवडे हा पत्नीवर संशय घेऊन तिला कायम मारहाण करीत असे. याच कारणावरून नरवडे याने बुधवारी रात्री तिला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी करीत स्वयंपाक घरातील कॅनमधील रॉकेल तिच्या अंगावर टाकले. मात्र, विवाहितेने मदतीसाठी आरडाओरडा करताच तो घराबाहेर पळ काढला. विवाहितेच्या तक्रारीनंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या फौजदार शुभांगी कुटे यांनी गणेश सुतार, अजित भुजबळ, तुषार पंदारे, चंद्रकांत काळे, रघुनाथ हाळनोर व काळकुटे या पोलिस पथकाच्या मदतीने चोवीस तासांत नीलेश नरवडे याला अटक केली.

तळेगाव ढमढेरे-केवटे मळा येथून चंदनाच्या झाडांची चोरी
Image may contain: outdoorतळेगाव ढमढेरे, ता. 4 जुलै 2019: केवटे मळा येथून चंदनाची १० झाडे चोरीला गेल्याची तक्रार येथील दगडू सोपान गायकवाड यांनी शिक्रापूर वनपरिक्षेत्र अधिकारी व शिक्रापूर पोलिस ठाण्यात केली आहे. तळेगाव ढमढेरे - केवटे मळा (ता.शिरूर) येथील दगडू सोपान गायकवाड यांनी वन अधिकारी व शिक्रापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार त्यांच्या मालकीच्या गट नंबर २२२२ मधील शेती क्षेत्रामधील चंदनाची १० झाडे चोरट्यांनी कापून नेली आहेत. त्यापैकी ४ झाडांचा बुंधा (खोड) पूर्ण कापून नेले आहे तर ६ झाडांचे खोड अर्धवट कापून टाकले आहे. शिरुर वन विभाग कार्यालयाच्या वतीने या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. यापूर्वी देखील चंदनाची झाडे चोरीला गेली असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. तळेगाव ढमढेरे परिसरात चंदनाची झाडे चोरणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून, तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, टाकळी भीमा आदी ठिकाणी चंदन चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने संबंधित विभागाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

कोरेगाव भीमा येथे दोन घरांच्या घरफोड्या
कोरेगाव भीमा, ता. 3 जुलै 2019 : येथील फडतरे वस्तीवर चोरट्याने मध्यरात्री दोन घरांच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून 16 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे तीन लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. फडतरे वस्तीवर उत्तम भोकरे व अप्पासाहेब दत्तात्रय फडतरे हे शेजारी राहतात. सोमवारी (ता. 1) मध्यरात्री दोनच्या सुमारास भोकरे उठले असता दरवाजाला बाहेरून कडी लावलेली होती. अप्पासाहेब फडतरे यांना फोनवरून सांगितल्यानंतर त्यांनी कडी उघडली. मात्र, चोरट्याने शेजारील हॉलच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश करीत एक लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले रोख 50 हजार रुपये चोरून नेले. यामध्ये 3 तोळ्यांची साखळी व लॉकेट तसेच दीड तोळ्याच्या दोन अंगठ्याचा समावेश आहे. फडतरे यांच्या घरातूनही दोन लाख रुपये किमतीचे सोने व 10 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी उत्तम करू भोकरे (वय 61) यांनी तक्रार दिली आहे.

कारेगावजवळ टेम्पोच्या धडकेत युवकाचा मृत्यू
Image may contain: 1 person, smiling, closeupशिरूर, ता. 4 जून 2019: पुणे-नगर रस्त्यावरील कारेगावजवळ असलेल्या फलकेमळा येथे टेम्पोच्या धडकेत तांदळी येथील युवकाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबतची तक्रार शरद कळसकर यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र रामदास कळसकर (वय 38) हा युवक आपल्या नातेवाइकांकडे कार्यक्रमासाठी गेला होता. कार्यक्रम उरकून परत गावाकडे येत असताना फलकेमळा दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्या वेळेस राजेंद्र रस्त्याच्या कडेला थांबलेले असताना पाठीमागून आलेल्या टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात कळसकर गंभीर झाल्याने तातडीने त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी कळसकर मृत झाल्याचे घोषित केले. पुढील तपास रांजणगाव गणपती पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

बलात्कार प्रकरणी दोघांना सक्तमजुरी
पुणे, ता. 4 जून 2019:
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला व त्याला मदत करणाऱ्या महिलेला प्रत्येकी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी हा निकाल दिला. दत्ता किसन बर्डे (वय 26) आणि ललिता अनिल भंडलकर (वय 32, दोघेही, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) अशी आरोपींची नावे आहेत. यातील बर्डे याला पाच तर ललिता हिला तीन हजार रुपये दंडही सुनावण्यात आला. याबाबत पीडित 17 वर्षीय मुलीने शिरूर पोलिसात फिर्याद दिली होती. पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी या प्रकरणाचा तपास केला. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. गेल्या 20 जानेवारी 2013 रोजी ही घटना घडली. पीडित मुलगी ललिता हिच्यासह सरपण आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी बर्डेने तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास, तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर तिला थकवा जाणवत होता. त्यामुळे ती सारखी झोपत होती. आईने विश्‍वासात घेऊन विचारल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला होता.

तळेगाव ढमढेरे येथे विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल
शिक्रापूर, ता. 30 मे 2019:
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तळेगाव ढमढेरे येथील दिलीप नाथू भुजबळ याच्यावर शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी पीडित महिलेने दिलीप नाथू भुजबळ (वय 50 वर्षे, रा. तळेगाव ढमढेरे, नाथ आळी, ता. शिरूर, जि. पुणे) या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (ता. 29) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पीडित महिला टाकळी भिमा हद्दीतील उसाच्या शेतामध्ये पाणी देत असताना दिलीप नाथू भुजबळ याने त्या महिलेच्या जवळ येऊन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी दिलीप नाथू भुजबळ यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार पुढील तपास करत आहेत.

शिरूर येथे युवकाची हाताच्या शिरा कापून आत्महत्या
शिरूर, ता. 25 मे 2019:
येथील प्रशांत किशोर पाटील (वय 19, रा. ओमरुद्रा रेसिडेन्सी, रामलिंग रोड, शिरूर) या युवकाने हाताच्या शिरा कापून व गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. 24) सकाळी नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी दादाभाई शांतिलाल महाले (रा. ओमरुद्रा रेसिडेन्सी, शिरूर) यांनी शिरूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. महाले व त्यांचे शेजारी किशोर शंकर पाटील हे दोघे रांजणगाव एमआयडीसीतील खासगी कंपनीत कामाला आहेत. सकाळी ते दोघेही कामावर आल्यानंतर नऊच्या सुमारास पाटील यांच्या घरून, "प्रशांत याने गळफास घेतला आहे', असा निरोप आल्याने दोघेही शिरूरला आले. त्या वेळी प्रशांत याने एका खोलीत छताच्या पंख्याला गळफास घेऊन व दोन्ही हाताच्या शीरा कापून आत्महत्या केल्याचे आढळले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिक्रापूर येथून धामारीचा युवक बेपत्ता
Image may contain: 1 person, selfie and closeupतळेगाव ढमढेरे, ता. 15 मे 2019: शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बस स्थानकावरून न्हावरे येथे जाण्यासाठी बसवून दिलेला युवक न्हावरे येथे न जाता बेपत्ता झाला असल्याची फिर्याद बेपत्ता युवकाच्या भावाने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे दिली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. धामारी (ता. शिरूर) येथून विशाल श्रीधर पंचमुख (वय २३ वर्षे, रा. न्हावरे ता. शिरूर जि पुणे) हा युवक ९ मे रोजी न्हावरा येथे जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी धामारी येथील चिंतामणी यादव यांनी विशाल याला शिक्रापूर येथील बस स्थानकावर आणून सोडले. त्यांनतर विशाल हा न्हावरा येथे त्याच्या भावाकडे पोहचलाच नाही. त्यांनतर त्याचा सर्वत्र नातेवाईक तसेच सर्व मित्रांकडे शोध घेतला असता तो कोठेही मिळून आला नाही. याबाबत बेपत्ता युवकाचा भाऊ सागर श्रीधर पंचमुख (रा. न्हावरे, ता. शिरूर जि पुणे) याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बेपत्ता युवकाचे वर्णन रंग गोरा, अंगात निळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅंट, लांब केस, काळी दाढी, उभट चेहरा असे असे आहे. सदर युवकाबाबत कोणासही काही माहिती मिळाल्यास शिक्रापूर पोलिसांशी ०२१३७२८६३३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण करत आहेत.

शिरूर बायपासला ट्रॅक्‍टर-मोटार अपघातात माजी उपसरपंचाचा मृत्यू
Image may contain: 1 person, beard and closeupशिरूर, ता. 11 मे 2019: शिरूर गावाबाहेरून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्‍टर ट्रॉलीवर मोटार धडकून झालेल्या अपघातात राजापूर (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील माजी उपसरपंच संभाजी तुकाराम वीर (वय 36) यांचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता. 9) रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर जखमी अवस्थेत वीर यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. 10) दुपारी त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्‍टरचालक ट्रॅक्‍टर घेऊन पळून गेला आहे.

तळेगाव ढमढेरे येथे संशयावरून झाला खून
तळेगाव ढमढेरे, ता. 6 मे 2019:
येथील पानाची टपरी जाळल्याच्या संशयावरून कैलास पेरेकर काळे (वय 50) यांचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी संशयित म्हणून अप्पासाहेब रामदास भोसले (वय 32, रा. काटेवाडी) याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बुधवारी (ता. 1) सायंकाळी तळेगाव ढमढेरे ते कासारी रस्त्यालगत असलेल्या एका तळ्याच्या कडेला कैलास काळे यांचा मृतदेह आढळून आला होता. तळेगाव ढमढेरे येथील धान्य कोठाराशेजारी अप्पासाहेब भोसले याची पानाची टपरी आहे. 1 मे रोजी सायंकाळच्या सुमारास कैलास काळे हे पानाच्या टपरीच्या शेजारी बिडी पीत उभे होते. यावेळी भोसले याची टपरी कोणतरी जाळली होती. काळे यांनीच टपरी साळल्याचा संशय भोसले याला होता.'

कोरेगाव भीमा येथे नदीपात्रात बुडून मुलाचा मृत्यू
कोरेगाव भीमा, ता. 3 मे 2019:
येथील भीमा नदीपात्रात नागेश दिलीप गायकवाड (वय 12, रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर जि. पुणे) याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 2) सकाळी उघडकीस आली. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा येथील नागेश गायकवाड हा मुलगा कालपासून बेपत्ता होता. नातेवाईक त्याचा शोध घेत असताना गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह भीमा नदीपात्रात आढळून आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.

शिक्रापूरमध्ये वेळनदी पुलावर टेम्पोने युवकाला चिरडले
शिक्रापूर, ता. 9 मार्च 2019:
येथील वेळ नदी पुलावरून पायी चालणाऱ्या दोघांना एका मद्यधुंद टेंपोचालकाने चिरडल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 7) घडली. या अपघातात प्राजक्ता दत्ता भागवत ही युवती गंभीर जखमी झाली आहे. गुरुवारी येथील नदीपुलावरून साहिल बाबूमिया शेख (रा. सणसवाडी, ता. शिरूर; मूळ रा. जोगेश्वरी पारगाव, जि. बीड) हा रस्त्यावरून चालला असताना त्याला मागील बाजूने भरधाव येणाऱ्या टेंपोने धडक दिली. त्यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या वेळी रस्त्यावरून चाललेली प्राजक्ता दत्ता भागवत (रा. करंदी, ता. शिरूर) ही गंभीर जखमी झाली. टेंपोचालक मत्रीराम यादव (रा. बाळागंज, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) हा मद्यधुंद अवस्थेत होता.

जांबूतमध्ये चोराने देवीच्या अंगावरील दागिने लांबवले
जांबूत, ता. 26 जानेवारी 2019: येथील श्री कळमजाई मंदिरातील दरवाजाची जाळी व दरवाजा तोडून एक तोळा सोन्याचे अलंकार व दानपेटी चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार पुजारी मारुती शंकर जोरी यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांबूत येथे कळमजाई देवीचे मंदिर आहे. पुजारी जोरी हे शुक्रवारी (ता. 25) सकाळी देवपूजा करण्यासाठी गेले होते. त्या वेळी मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा तोडलेला दिसला. मंदिरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या वेळी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिली. चोराने देवीच्या अंगावरील एक तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, अलंकार व दानपेटीतील अंदाजे 7 हजार रुपये लंपास केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे व पोलिस कर्मचारी संजय साळवे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी बाळकृष्ण साबळे करत आहेत. चार दिवसांपूर्वी या भागात फाकटे येथील राममंदिरात चोरीची घटना घडली. त्यानंतर या भागात मंदिरातील चोरीची ही दुसरी घटना आहे.

महिला गेली वारीला अन् चोरटा गेला चोरीला
शिरूर, ता. 4 डिसेंबर 2018:
आळंदी येथे वारीला गेलेल्या महिलेच्या घराचा दरावाजा तोडून चोरट्याने लाख रुपयांवर डल्ला मारल्याची घटना येथे घडली. भीमाबाई गंगाराम करंजुले (रा. सैनिक सोसायटी शेजारी, हुडको कॉलनी, गणेश मंदिरासमोर, शिरूर) या आळंदी येथे वारीसाठी गेल्या होत्या. त्यांचे दुमजली घर आहे. चोरट्याने कुलुप तोडून कपाटीताली साठ हजार रुपये किंमतीचे गंठण, मोहनमाळ, नथ, डोरले व नव्वद हजार रुपये रोख असे मिळून सव्वा दोन लाखांवर डल्ला मारला.

जांबूत येथ ट्रॉली खालू दबून मजूर ठार
जांबूत, ता. 4 डिसेंबर 2018:
उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन त्याखाली दबून दगा चंदरसिंग भील (वय 32, रा. वाक वडती, ता. बडगाव, जि. जळगाव) हा ऊस मजूर जागीच ठार झाला. जांबूत जवळ असलेल्या नेहर मळा येथे ही मंगळवारी (ता. 4) दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरखेडला बेकायदा दारू साठा जप्त
पिंपरखेड, ता. 4 डिसेंबर 2018 : पिंपरखेड येथील हॉटेल शिवानंदच्या मागील बाजूस लपवून ठेवलेला देशी-विदेशी दारूच्या बाटल्यांचा साठा शिरूर पोलिसांनी शनिवारी (दि. 1) सायंकाळी जप्त केला. देशी-विदेशी दारूचा बेकायदा साठा व विक्रीप्रकरणी वैभव संदीप बोऱ्हाडे (रा. पिंपरखेड, ता. शिरूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. बेकायदा दारूअड्डे, गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्‌टी उद्‌ध्वस्त करण्याबरोबरच; चोरट्या, बेकायदा दारूविक्री विरोधात शिरूर पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या