स्वप्नील ढमढेरे सलग चौथ्यांदा महाराष्ट्र चॅम्पियन

तळेगाव ढमढेरे,ता.१ एप्रिल २०१८(प्रा.एन.बी.मुल्ला) : महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या धनुर्विद्या स्पर्धेत स्वप्नील ढमढेरे याने जेतेपद मिळवुन सलग चौथ्यांदा महाराष्ट्र चॅम्पियन बनण्याचा मान मिळविला आहे.
१६ व्या वरिष्ठ गट महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या स्पर्धा कोल्हापूर येथे दि.२९ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत पार पडल्या. स्वप्नील ढमढेरे याने वैयक्तिक लढतीमध्ये जालना जिल्ह्याच्या अजित वासेकर, पिंपरी चिंचवडच्या अजय माळशिकरे व साताराच्या ऋषिकेश गुजर यांना पराभूत केले. अंतीम फेरीत अमरावतीच्या दिनेश उंबरेकर याला ३ गुणांनी हरवून स्वप्नील ढमढेरे याने महाराष्ट्र चॅम्पियन बनण्याचा मान मिळविला. 

त्याचबरोबर गुणांकन प्रकारात ६८६ गुण मिळवून १ सिल्वर पदक, सांघिक प्रकारात एक, एक कांस्य पदक मिळवून स्वप्नील ढमढेरे याने एकूण ३ पदकांची कमाई केली. या पुढे होणाऱ्या पुणे येथील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (घोरपडी) येथे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी स्वप्नीलची निवड झाली आहे.

याच स्पर्धेमधून एशीयन गेम्स २०१८ व  नॅशनल गेम्स २०१८  साठी खेळाडूंची निवड होणार असल्याने भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी असल्याचेही यावेळी बोलताना ढमढेरे याने सांगितले. आमदार सुजित मिणचे व आमदार अमोल महाडिक यांचा हस्ते स्वप्नील ढमढेरे याला सुवर्ण पदक प्रदान करून गौरविण्यात आले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या