लेका एवढी लेकही भारी; हाच संदेश घरोघरी

Image may contain: 9 people, people standingदेवदैठण,ता.६ मे २०१८(दिपक वाघमारे) : श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी दुमाला येथील शिंदे कुटुंबियांनी स्त्री भ्रूण हत्येवर प्रकाश टाकताना विवाह सोहळ्यातून स्त्री जन्माचे स्वागत करा असा सामाजिक संदेश दिला.

इनामगाव (ता.शिरुर, जि.पुणे) येथे सुरेश भाऊसाहेब शिंदे (हिंगणी, ता. श्रीगोंदा) आणि सारिका अर्जुन डोमाळे (वांगदरी, ता. श्रीगोंदा) या नवदाम्पत्याचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. फटाक्यांची अताषबाजी, डीजेचा कर्णकर्कश्य दणदणाट, पाहुण्यांचे सत्कार वा इतर अनावश्यक बाबींना फाटा देताना नवनाथ शिंदे आणि दीपक वाघमारे यांच्या पुढाकारातून यशवंत प्रतिष्ठाण, हिंगणी व सुरभी बहुउद्देशिय संस्था, देवदैठण यांच्या वतीने विवाह सोहळयानिमित्त " बेटी बचाओ ; बेटी पढाओ " उपक्रमांतर्गत स्त्री जन्म स्वागत हा सामाजिक उपक्रम राबविला. स्त्री जन्म स्वागताच्या प्रणेत्या डॉ. सुधा कांकरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ. उज्वला हाके, भाजपा जिल्हा सरचिटणीस सुवर्णा पाचपुते, पं.स. सदस्या कल्याणी लोखंडे, अॅड. कमल सावंत आदी उपस्थित होत्या.

डॉ. कांकरिया यांनी स्त्री जन्म स्वागताच्या आठव्या फेऱ्या विषयी समजावून सांगत उपस्थित वऱ्हाडी मंडळींना स्त्रीभ्रूण हत्या टाळण्याचे आवाहन केले. यावेळी हिंगणी गावात एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाहि. तसेच जन्माला येणाऱ्या प्रत्येक सुकन्येचे स्वागत ' कन्या जन्म आनंद ' सोहळयाने करू असा ग्रामसभेचा ठराव ग्रा.पं. सदस्य ज्ञानदेव शिंदे यांनी डॉ. कांकरिया यांच्याकडे सुपुर्द केला. या ठरावाचे वाचन भाजपा जिल्हा सरचिटणीस सुवर्णा पाचपुते यांनी केले. त्यानंतर हजारोंच्या साक्षीने पुरोहितांच्या पवित्र मंत्रोपच्चाराने विवाह संस्कारात सप्तपदी नंतर "लेका एवढीच लेकही भारी ; हाच संदेश घरोघरी ! आठवा फेरा घेऊया ; स्त्री जन्माचे स्वागत करुया .....! अशी प्रार्थना करत वधू - वरांनी स्त्री जन्माच्या स्वागताचा आठवा फेरा घेतला अन् उपस्थितांनी टाळयांच्या कडकडाटात या उपक्रमाचे कौतुक करत उदंड प्रतिसाद दिला. शेवटी कांकरिया यांनी नव वधू - वरांना स्त्री जन्माचे स्वागत करा हे पुस्तक व प्रमाणपत्र भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी स्त्री जन्म स्वागताच्या प्रणेत्या  डॉ.सुधा कांकरिया यांनी बोलताना सांगितले कि, वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा या अट्टाहसापायी स्त्री भ्रूण हत्येचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. स्त्री जन्माची घटती संख्या समाज पोखरून टाकत आहे. आपण वेळीच जागे झालो नाहि अथवा तातडीने काहि उपाययोजना केल्या नाहित तर स्त्री अथवा आई विना जगाचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाहि आणि मग जगातील माणुसकीही लोप पावेल. त्यामुळे स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यास मदत करा, स्त्री जन्माचे स्वागत मनापासून करा.
             

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या