चोरटयांचा पाठलाग करून एकाला पकडले पण...

शिरुर, ता. 8 मे 2018 (प्रतिनिधी): तर्डोबाची वाडी (ता.शिरुर) येथे तीन चोरट्यांनी घराचा दरवाजाचा लॉक तोडून घरातील व्यक्तींच्या अंगावरील सोने व रोख रक्कम असे मिळून एकूण ९० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना सोमवारी (ता. ७) पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अनिता पोपट पाचर्णे (वय ४०) यांनी तक्रार दिली आहे.
शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पती व मुलासह तर्डोबाची वाडी येथे राहत आहेत. रविवारी (ता. 6) रोजी घरातील कामे आटोपून राञी घराचे सर्व दरवाजे बंद करुन पती व मुला समवेत घरात झोपले होते. झोपतांना त्यांनी घरातील सर्व लाईटी बंद केल्या होत्या. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास फिर्यादी झोपल्या असता त्यांच्या घरातील कपाटाजवळ एक लाईट चालू असलेली दिसली. त्यावेळी त्यांनी पती व मुलाला याबाबत कल्पना देउन उठविले. त्यावेळी कोणीतरी शुक-शुक केल्याचा आवाज आल्यानंतर आपल्या घरात कोणी तरी प्रवेश केला आहे याची त्यांना खाञी पटली. ते पाहण्यासाठी त्या उठण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा त्यातील एका चोरट्याने फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसुञ तोडले व तो घेउन तो बाहेर पळाला.
तेवढ्यात फिर्यादीच्या पती व मुलाने तिघा चोरटयांचा पाठलाग केला. व त्यातील एकाला पकडले. परंतु त्या चोरट्याने फिर्यादीच्या दंडावर काठीने व मुलाच्या पायावर दगडाने जोरात मारले व ती व्यक्ती त्यांच्या तावडीतून सुटुन गेली. त्यानंतर फिर्यादींनी तीन चोरटे २०-२५ वयोगटातील असल्याचे पाहिले. यानंतर घरात पाहणी केली असता कपाटातील २५ साडया, रोख रक्कम ५ हजार,५० हजार रुपये किंमतीचे अंगावरील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, २५ हजार रुपये किंमतीचे एक तोळ्याचे मंगळसुञ असे मिळून एकुण ९० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला.
यानंतर फिर्यादी यांनी शिरुर पोलीस स्टेशनला धाव घेत अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भिमगोंडा पाटील हे करत आहेत.