चालकाला डुलकी लागल्याने एसटी घुसली दुकानात

Image may contain: outdoor
सणसवाडी, ता. 18 मे 2018: पुणे-नगर रस्त्यावर गुरुवारी (ता. 17) पहाटे साडेतीनच्या सुमारास अंबड-पुणे या एसटी चालकाला डुलकी लागल्याने एसटी रस्ता दुभाजकावर आदळून एका अॅटोमोबाईल्सच्या दुकानात घुसली. एसटी बसमधील 21 प्रवाशी जखमी झाले असून, जखमींच्या उपचाराचा खर्च एसटी महामंडळ करणार आहे.

शिक्रापूर पोलिस व ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबड ते पुणे मार्गावरील एसटी (क्र. एम. एच. 20 बि. एल. 3063) या बसवरील चालक शामराव जाधव यांना झोप लागल्याने बस वरील ताबा सुटला व एसटी रस्ता दुभाजकावर आदळून आबासाहेब दरेकर यांच्या यश अॅटोमोबाईल्स या दुकानात घुसली. यावेळी बसचा वेग जास्त असल्याने निम्म्याहून अधिक दुकानाचे तसेच बांधकामाचे नुकसान झाले. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस नाईक संजय ढमाल, विजय गाले यांनी घटनास्थळी भेट देत काही जखमींना उपचारासाठी शिक्रापूरात तर काही गंभीर जखमींना पुण्यात उपचारासाठी दाखल केले.

बस चालक शामराव बबन जाधव (रा. दुसरबीड ता. शिंदखेडराजा जि. बुलढाणा) व वाहक भगवान भीमराव मसुरे (रा. राममंदिर गल्ली अंबड) हे दोघेही जखमी झाले आहेत. याबाबत राहुल ज्ञानदेव जगताप (रा. शास्त्रीचौक आळंदी रोड भोसरी पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार उमेश जगताप करीत आहेत.

दरम्यान, एसटीचे पदाधिकारी, लेखनिक अर्जुन चव्हाण, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक बेंडाले, एस टी कामगार संघटना अध्यक्ष नितीन देशमाने, शामराव दौंडकर, राजेंद्र शेळके, नवनाथ लकडे, गणेश रत्नपारखी यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेवून घटनास्थळाचीही पाहणी केली. गंभीर जखमीच्या उपचाराचा खर्च देण्यात येईल, त्यांनी जवळच्या एसटी डेपोत तो सादर करावा, असे आवाहन शिरूर एसटी आगार व्यवस्थापक गोविंदराव जाधव यांनी केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या