शेतकरी संपात सहभागी होण्याचा एकमुखी निर्णय

शिरूर, ता. 1 जून 2018: राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता मंचने आजपासून (शुक्रवार) पुकारलेल्या शेतकरी संपात शिरूर तालुक्‍यातील सर्व शेतकरी संघटनांनी सहभागी होण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. आपला माल आपल्या गावातच विकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे, अशी माहिती समन्वय समितीचे सदस्य नितीन अर्जुन थोरात यांनी दिली.

शेतकऱ्यांनीच शहराच्या किंवा तालुक्‍याच्या ठिकाणी शेतमाल आणू नये, असे आवाहन शेतकरी संघटनांच्या समन्वय समितीने केले आहे. विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान महासंघाने देशव्यापी संपा पुकारला आहे. या संपाच्या नियोजनासाठी आज येथे तालुक्‍यातील विविध शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी महासंघाच्या प्रदेश समन्वय समितीचे सल्लागार श्रीकांत तराळ, समन्वय समितीचे सदस्य शंकर दरेकर यांनी या बैठकीत संपाबाबत मार्गदर्शन केले.

समन्वय समितीचे सदस्य नितीन थोरात, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, आबासाहेब जाधव, प्रकाश थोरात, नितीन जाधव, राहुल शिंदे, बी. आर. माशेरे, कैलास पवार, वैभव माशेरे, विजय भोईरकर, पोपटराव घुले, सुधीर पवार, विजय साळवे, जितेंद्र थोरात, बाबूराव कुरंदळे, बाळासाहेब झाडगे उपस्थित होते.

एक ते दहा जूनपर्यंत चालणाऱ्या या संपात सहभागी होण्याचा निर्णय शिरूर तालुक्‍यातील सर्व शेतकरी संघटनांनी व सामान्य शेतकरी वर्गाने घेतला आहे. शेतकरी वर्गाने शेतमाला बाजारात न आणता आपल्या गावातच विकावा. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाही या संपाला पाठिंबा असून, संप यशस्वी केला जाईल, असे नितीन थोरात यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या