स्पर्धा परीक्षेतील यशासाठी स्वप्रेरणा महत्वाची: डफळ

जातेगाव बुद्रुक, ता. 7 जून 2018: आत्मविश्वास, कामातील सातत्य, ज्ञानधारणा आणि स्वप्रेरणा ही स्पर्धा परीक्षेतील यशासाठी महत्वाची आहे. यशासाठी सदैव कार्यरत रहा, मनांत नैराश्य बाळगू नका, असे आवाहन तहसिलदार पदावर निवड झालेले आदेश डफळ यांनी विद्यार्थ्यांना केले.
जातेगांव बुद्रुक (ता. शिरूर) येथील संभाजीराजे विद्या संकुलात बुधवारी (ता. ६) आयोजित कार्यक्रमात तहसिलदारपदी निवड झाल्याबद्दल आदेश डफळ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव व घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश पवार, प्राचार्य रामदास थिटे, संचालक साहेबराव उमाप, धामारी विकास सोसायटीचे चेअरमन कैलास डफळ आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे सचिव प्रकाश पवार म्हणाले, शिरूर तालुका हा स्पर्धा परीक्षेत यश मिळविणे कामी सदैव अग्रेसर राहिला आहे. जातेगाव येथील उमाप कुटुंबीय, क्षीरसागर कुटुंबीय यांनी गावच्या वैभवांत भर घातली आहे. डफळ यांच्या रूपाने सामान्य परिस्थितीवर मात करत यश प्राप्त करता येते हा विद्यार्थासमोर आदर्श आहे.
प्रास्ताविक भाषणात थिटे म्हणाले, महाराष्ट्र राज्य सेवा आयोग २०१७च्या परीक्षेत शिरूर तालुक्याने घवघवीत यश संपादन केले आहे. मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाने उपजिल्हा अधिकारी पदावर रोहीणी ताई विरोळे, मुख्याधिकारी पदावर निवड झालेले हेमंत ढोकले, प्रियांका शिंदे, संपत माळी तसेच तहसिलदार आदेश डफळ यांची निवड झाली आहे. तालुक्याच्या दृष्टीने ही यशाची पंचतारांकीत कामगिरी आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश बांगर यांनी केले तर प्रा. शंकर भुजबळ यांनी आभार मानले.