मजुरी करणाऱया सख्या भावांना दहावीत एकसारखेच गुण

Image may contain: 2 people, selfie
देवदैठण, ता. १२ जून २०१८ (संदीप घावटे) : परिस्थिती माणसाला जग दाखवते , जगायला शिकवते व जगण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही या गोष्टी ओळखून श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील विद्याधाम प्रशालेतील गणेश पाटील व सुधाकर पाटील या दोघा सख्ख्या भावंडांनी कष्टाने शिक्षण घेऊन दहावी परीक्षेत सारखेच यश संपादन केले आहे. समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

गणेशने ५०० पैकी ३०७ म्हणजे ६१ .४० टक्के आणि सुधाकरने ५००पैकी ३०६ म्हणजे ६१ .२० टक्के गुण मिळवले. या दोघांमध्ये फक्त एका गुणांचा फरक राहीला.गणेश व सुधाकरचे वडील बाळाप्पा व आई सुमोव्वा हे देवदैठण येथील शिवाजी नाव्हकर यांच्या खडी क्रेशर वर कामासाठी २००५ साली आले  होते. त्यांचे मुळ गाव कर्नाटकातील बेळगाव जवळील पाचापूर आहे.येथे आल्यावर कष्टाने या दोघांचा संसार सुरू झाला.

गणेश व सुधाकर ही दोघ भावंड इयत्ता चौथीमध्ये शिकत असताना त्यांचे आईवडील येथील काम बंद पडल्यामुळे मुळ गावी परतले. येथील शाळा व परिसर चांगला असल्याने ही दोन मुल इथेच रमली.या काळात क्रेशर बंद पडले असताना देखील  क्रेशर मालक शिवाजी नाव्हकर यांनी त्यांना आधार दिला. यानंतर त्यांची जगण्याची लढाई सुरू झाली , गावापासून दूर असणाऱ्या क्रेशरवर झोपडीत राहुन दोघेजण स्वावलंबी जीवन जगू लागले . स्वतः बाजारहाट करून आणत स्वयंपाक देखील ते स्वतः बनवत होते.अभ्यास, शाळा या गोष्टी सांभाळून सुटीच्या काळात शेतमजूरी करणे, दगड फोडणे, गवंडयाच्या हाताखाली काम करून ते आपला खर्च भागवत.लहान वयात कष्ट करून दोघांनी ६ कि मी ची रोज पायपीट करून दहावी पर्यत शिकत असताना घवघवीत यश संपादीत केले.विद्याधाममध्ये शिकत असताना दोघेही स्काऊटमध्ये सहभागी झाले जांभोरी (म्हैसूर) या राज्यस्तरीय स्काऊट शिबीरासाठी सहभागी झाले होते यातुन स्वावलंबन, सहकार्य, आदरभाव, खिलाडूवृत्ती या गुणांची जोपासना झाली. हेच गुण  त्यांचे कष्टदायक जीवन सुसहय करण्यासाठी लाभदायक ठरले.

या काळात पाटील भावंडांसमोर अनंत अडचणी आल्या यावेळी शिवाजी नाव्हकर, अंकुश खेडकर, वर्गमित्र व शिक्षकांनी बहुमोल मदत केली. आई वडील गावी परतल्यानंतर आम्ही स्वतः सुटीच्या काळात काम केले. स्वयंपाक हाताने बनवला, भविष्य उज्वल बनविण्यासाठी शिकावंच लागेल याची जाणिव होती. आम्ही दोघांनी  काम करुन  अभ्यास करून यश मिळवले यात शिवाजी नाव्हकर मामा यांचे मार्गदर्शन मिळाले. मला मॅकॅनिकल इंजिनिअर व्हायचयं तर गणेशला भारतीय सैन्यात जाण्याची इच्छा आहे असे सुधाकर पाटील म्हणाले तर शिवाजी नाव्हकर यांनी गणेश व सुधाकर यांना आधार दिला कारण वडील बाळाप्पा हे प्रामाणिक व कष्टाळू होते, ही मुलं लहान वयातच एकटी राहू लागली. सुट्टीच्या काळात ते माझ्या शेतात स्वेच्छेने काम करत त्याचा मोबदला त्यांच्या शिक्षणासाठी खर्च करून त्यांना दिशा दाखवण्याचे काम केले.पालक म्हणून जबाबदारी सांभाळली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या