'त्या' ९ मुलांना शिक्षकांनी आणले शिक्षणाच्या प्रवाहात

Image may contain: 7 people, people smiling, people standing and outdoorतळेगाव ढमढेरे, ता.२ जुलै २०१८(प्रतिनीधी) : तळेगाव ढमढेरे येथील पारधी समाजातील ९ मुलांना  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या घरी जाऊन व शिक्षणाचे महत्त्व सांगून शाळेत दाखल केले.

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र टिळेकर, केंद्रप्रमुख नानासाहेब वाजे व शिक्षकांच्या प्रयत्नातून पारधी समाजातील मुले तळेगावच्या जिल्हा परिषद शाळेत हसत खेळत शिक्षण घेत आहेत. समाजातील वंचित घटकातील मुले शिकली पाहिजेत ती शाळाबाह्य राहता कामा नयेत यासाठी शिरूरचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी शिक्षकांना विशेष मार्गदर्शन केले होते.

त्याचाच एक भाग म्हणून पारधी समाजातील कुटुंबाची अत्यंत दयनीय अवस्था असल्याने त्यांच्या मध्ये व त्यांच्या मुलांमध्ये शिक्षणाविषयी अत्यंत अनास्था असते. त्यामुळे ही मुले शाळेत जात नाहीत तसेच पालक देखील त्यांना शाळेत पाठवत नाहीत. येथील शिक्षकांनी प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि मुलांना शाळेत पाठवण्याची विनंती केली. यावेळी पालकांनी सांगितले की आम्ही गरीब आहोत, शिक्षणासाठी आमच्याकडे पैसा नसतो, त्यांना चांगले कपडे घेता येत नाहीत त्यामुळे आम्ही आमच्या मुलांना शाळेत  पाठवत नाही.

यावर शिक्षकांनी सांगितले की तुम्हाला शिक्षणासाठी आम्ही काहीही खर्च येऊ देणार नाही शिवाय सर्वांना पुस्तके गणवेश व पोषण आहार देखील देऊ. त्यामुळे तुमची मुलं इतर मुलांसारखेच टापटीप राहतील व शिक्षण घेतल्यामुळे ते गैरमार्गाला जाणार नाहीत. शिक्षकांनी सांगितलेलं शिक्षणाचे महत्व पालकांना देखील पटल्याने  त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रोशन धनु काळे, प्रीती गणेश शिंदे, शर्मिदा धनु काळे,  साक्षी अभिमान भोसले (इयत्ता पहिली), अमर गणेश शिंदे, सुभाष धनु काळे, राजकुमार भोसले (इयत्ता दुसरी), अजय गणेश शिंदे (इयत्ता तिसरी), रोहित गणेश शिंदे (इयत्ता चौथी) ही ९ मुले शाळेत दाखल झाली. या सर्व मुलांना ग्रामपंचायतीच्या वतीने शालेय साहित्य, वह्या, पुस्तके व गणवेश देण्यात येणार आहे. या सर्व मुलांना शाळेत आल्यानंतर इतर सर्व विद्यार्थ्यांबरोबर पोषण आहारही देण्यात आला.

त्यामुळे ही सर्व मुले आनंदित झाली व इतर मुलांबरोबर मिळून-मिसळून खेळू बागडू लागली असून आनंदात शिक्षणही घेत आहेत. या मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी शिक्षकांनी हिरिरीने भाग घेतल्याने शाळेतील सर्व शिक्षकांचेही परिसरात कौतुक होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या