बारामती मंडलात महावितरणची देखभाल व दुरुस्तीची कामे

बारामती,ता.११ जुलै २०१८(प्रतिनीधी) : पालखी मार्गावर वीजसुरक्षेच्या उपाययोजना तसेच पालखी मुक्कामाच्या विविध ठिकाणी सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणने देखभाल व दुरुस्तीचे कामे केली असून अभियंते व शेकडो कर्मचारी या पालखी सोहळ्यात कर्तव्य बजावणार आहेत.

बारामती ग्रामीण मंडल अंतर्गत बारामती, सासवड व केडगाव विभागाच्या कार्यक्षेत्रातून पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. तसेच विविध ठिकाणी मुक्कामी असतात. या पार्श्वभूमिवर महावितरणने पालखी सोहळ्यादरम्यान अखंडित वीजपुरवठ्यासाठी देखभाल व दुरुस्तीची कामे केली आहेत. बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे व बारामती मंडलाचे अधीक्षक अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी पालखी सोहळ्याच्या तयारीचा नुकताच आढावा घेतला. पालखी मार्गावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी वीजयंत्रणेची स्थळपाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीचे कामे करण्यात आली आहेत. तसेच पालखी मुक्कामाच्या दिवशी संबंधीत ठिकाणी सुरळीत वीजपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पालखी मार्गावर असलेल्या वीजयंत्रणेच्या विविध देखभाल व दुरस्तीच्या कामांसह आवश्यक तेथील रोहित्रांना सुरक्षा कुंपण करण्यात आले आहे. तसेच नादुरुस्त झालेले रोहित्र तातडीने बदलण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी अतिरिक्त रोहित्र असलेले एक वाहन सज्ज ठेवण्यात आले आहे. बारामती ग्रामीण मंडलअंतर्गत महावितरणचे अभियंते आणि शेकडो कर्मचारी सोहळ्यासाठी कर्तव्य बजावणार आहेत. त्यांच्या नियुक्तीबाबतची पोलिस विभाग व पालखी सोहळा प्रमुखांना देण्यात आली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या