सामाजिक बांधिलकीसाठी रोटरीच्या चळवळीत सहभागी व्हा
शिक्रापुर,ता.३० जुलै २०१८(प्रतिनीधी) : रोटरी क्लब हा एक प्रवास असून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी रोटरीच्या चळवळीत सहभागी होऊन जीवनातील समाजसेवेचा ध्यास प्रत्येकाने पूर्ण करावा असे आवाहन रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल शैलेश पालेकर यांनी केले.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरच्या वतीने आयोजित पदग्रहण समारंभात पालेकर बोलत होते. या कार्यक्रमात सन २०१८-१९ या वर्षासाठी डॉ. राम पोटे यांची रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी तर प्रा. रमेश वाळके यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र गायकवाड व सचिव प्रा. संजय देशमुख यांनी आपला पदभार नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिवांना सुपूर्द केला. यावेळी शिरूरचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे, सहाय्यक प्रांतपाल नीरज परदेशी, संस्थापक अध्यक्ष वीरधवल करंजे, डॉ. अभिजीत सोनवणे, जिल्हा सचिव संजय कुलकर्णी, प्रमोद पालीवाल, मंगेश हांडे, नवोदय विद्यालय समितीचे उपाध्यक्ष सुरेश आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे जिल्हा रोटरी क्लबच्या वतीने येत्या क्रांती दिनी ९ ऑगस्ट रोजी अवयव दान नोंदणीचा संकल्प केला असून या उपक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद होण्याची तयारी केल्याचे यावेळी बोलताना पालेकर यांनी सांगितले. अवयव दान नोंदणीत सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले. माजी आमदार पलांडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की शिक्रापूर रोटरी क्लबने अल्पावधीतच आपल्या विविध समाजोपयोगी उपक्रमातून शिरूर तालुक्यात नावलौकिक मिळविला आहे. तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळांना ई-लर्निंग संच, स्वच्छतागृह, जलशुद्धीकरण यंत्र पुरविले. तसेच आरोग्य तपासणी करून निरोगी जीवनाचा कानमंत्रही रोटरीने दिला आहे.
राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदीचे समर्थन करून पुणे नगर हायवे वरील कचरा समस्येवर त्यांनी यावेळी लक्ष वेधले. डॉ. मच्छिंद्र गायकवाड यांनी त्यांच्या कार्यकाळात रोटरी क्लब ऑफ शिक्रापूर ने केलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचा आढावा घेतला व रोटरी क्लबला मिळालेल्या पुरस्कारांची माहिती दिली. या कार्यक्रमात रोटरी च्या वतीने जनसेवा फाउंडेशच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. राम पोटे यांनी आगामी वर्षात रोटरीतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रामदास थिटे यांनी केले. प्रा. संजीव मांढरे यांनी सूत्रसंचालन केले तर मयूर करंजे यांनी आभार मानले.