निमोणेत वाळूवरून दोन गटांत हाणामारी

Image may contain: grass, outdoor and nature
निमोणे, ता. 7 ऑगस्ट 2018 (तेजस फडके): निमोणे गावामध्ये अनधिकृत वाळू वाहतुकीच्या कारणावरुन दोन गटात लोखंडी गज, काठ्या, दगड यांच्या साह्याने झालेल्या हाणामारीत दोन्ही गटांतील दोन वाळूचोर जखमी झाले असून, त्यांच्यावर सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहे.

विकास ऊर्फ बाप्पू विलास होळकर आणि भरत भाऊसाहेब काळे या दोघांनीही शिरुर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. त्यामुळे अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या वाळू वाहतुकीला नक्की कुणाचा वरदहस्त आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बाप्पू होळकर याने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, भरत भाऊसाहेब काळे हा ट्रॅक्टरने घोड नदीतून वाळू वाहतुक करत होता. ज्या रस्त्याने तो वाळू वाहतूक करत होता. तेथे आमची व चुलत्याची सामाईक पाईपलाईन असल्याने ती फुटत आहे. तू येथून ट्रॅक्टर नेऊ नकोस असे बाप्पू होळकर याने भरत काळे याला सांगितले. परंतु, भरत काळे याने मी येथूननच ट्रॅक्टर नेणार असे म्हणत शिवीगाळ करुन डोक्यात दगड मारला. तसेच राजेंद्र भाऊसाहेब काळे आणि कैलास भाऊसाहेब काळे यांनी मला मारहाण केल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे.

भरत काळे याने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, घोडनदी पात्रालगत गट नं ४५४ मध्ये आमची वडिलोपार्जित जमीन आहे. बाप्पू होळकर, अमित कैलास होळकर व रमेश पोपट होळकर हे घोडनदीतून वाळू आणुन आमच्या जमिनीत साठा करुन ठेवत होता. त्यावेळी त्याला आमच्या जमिनीत वाळू साठा करु नका हि आमची जमीन आहे असे त्याला सांगितले. परंतु, बाप्पू होळकर याने आम्ही इथंच वाळू खाली करणार असे म्हणत शिवीगाळ करत माझा भाऊ राजेंद्र काळे याला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मी मध्ये पडलो असता लोखंडी गज माझ्या डोक्यात मारला असल्याचा फिर्यादीत उल्लेख केला आहे.

दरम्यान, प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारूनही त्यास भीक न घालणारी ही वाळूचोरांची यंत्रणा दिवसेंदिवस मुजोर बनत चालली आहे. त्यामुळे घोड नदीपात्रात वाळूचोरीच्या निमित्ताने होणाऱ्या हाणामाऱ्या भविष्यात रक्तरंजित होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने वेळीच कठोर कायद्याचा बडगा उगारणे गरजेचे ठरणार आहे. www.shirurtaluka.com ने यापूर्वी व्हिडिओसह बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे आणि पोलीस हवालदार अविनाश गायकवाड करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या