शिरुरमध्ये आंदोलनादरम्यान जागरण गोंधळ (Video)

Image may contain: one or more people, people standing and outdoor
शिरुर, ता.९ अॉगस्ट २०१८ (मुकुंद ढोबळे, तेजस फडके, सतीश केदारी) : सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या बंद ला शिरुर शहर व परिसरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असुन शांततेत बंद पार पडला.शिरुर शहरात जागरण गोंधळ घालण्यात आला.तर महिलांनी चुलीवर भाकरी भाजल्या.

शिक्रापुर ला शांततेत पार पडला बंद
पुणे - अहमदनगर महामार्गावर शिक्रापूर येथील चाकण चौक, पाबळ चौक व परिसरातील गावामध्ये पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज सकाळपासूनच महाराष्ट्र बंदमुळे महामार्गावरील वाहतूक अगदी कमी होती त्यामुळे नेहमीच्या वर्दळीच्या महामार्गावर शुकशुकाट जाणवत होता. दरम्यानच्या काळात परिसरातील आंदोलनकर्त्यांचे दुचाकीवरून तसेच पायी असे चार मोर्चे निघाले होते. परिसरातील सर्व दुकाने देखील मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ महाराष्ट्र बंदमुळे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होते. परिसरातील इंटरनेट सेवाही शासनाच्या आदेशानुसार दिवसभर बंद होती. एकंदरीत बंद शांततेत पार पडल्याचे परिसरात चित्र होते.

शिरुर शहरात जागरण गोंधळ
बंद च्या पार्श्वभुमीवर गुरुवार(दि.९) रोजी सकाळपासुन शहरातील सर्वच व्यापारी पेठा बंद होत्या.शहरातील चौका-चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.शिरुर शहरालगत  असलेला पुणे-नगर महामार्गावर अनुचित प्रकार घडु नये म्हणुन न्हावरे फाटा येथेही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.शिरुर शहरासह परिसरात प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणुन शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश दिला होता,त्यानुसार शिरुर शहरातील विद्याधाम प्रशाला,सी.टी बोरा कॉलेज,रयत शिक्षण संस्था,इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळा,क्लासेस यांसह सर्व शाळांना एकदिवसीय सुट्टी देण्यात आली होती.शिरुर बसस्थानक हे नेहमी प्रवाशांनी गजबजलेले असते परंतु बस्थानकातही दिवसभर शुकशुकाट होता.शिरुर बसस्थानकाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणुन पहाटे पासुनच आगारातील एकही बस बाहेर पडली नाही.त्याचबरोबर खासगी वाहनेही बंद असल्याने शहरासह पुणे-नगर महामार्गावर प्रथमच शांतता अनुभवायला मिळाली.शिरुर शहरातील अत्यावश्यक सेवा, हॉस्पिटल सुरु होते.काही मेडिकलही बंद होती.दरम्यान शिरुर शहरातील सकल मराठा समाजाच्यावतीने शांततेत मोर्चा पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले होते.त्यानुसार,सकाळी मराठा बांधवांच्या वतीने क्रांतीदिनानिमित्त हुतात्मा स्तंभाला अभिवादन करण्यात आले.त्यानंतर शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमिती येथील शिवछञपती यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मोर्चाला सुरुवात करण्यात आली.या मोर्चात लहान मुले,महिला,तरुणवर्ग,आबालवृद्ध सर्व पक्ष व संघटनांचे पदाधिकारी सामील झाले होते.नंतर मोर्चेकरांनी शिरुर नगरपालिकेसमोर रस्त्याच्या मध्यभागी सकाळी ११ वाजलेपासुन बसुन ठिय्या आंदोलनात केले.
या आंदोलनात युवतींसह अनेक मान्यवरांची भाषणे झाली.त्याचप्रमाणे जागरण गोंधळही घालण्यात आला.या जागरण गोंधळाला उपस्थितांनी शेवटपर्यंत दाद दिली.तर सरकारचा निषेध म्हनुन संताप व्यक्त करत अक्षरश: महिलांनी चुलीवर भाकरीही भाजल्या.थंड पाण्याने अंघोळी ही काहींनी केल्या.
या वेळी सानिका खोडदे,श्रुती रोकडे,नुपुर शेळके,इश्वरी पवार,संस्कृती शेवाळे,जाधव यांनी भाषणे केली व याच मुलींच्या हस्ते शिरुरचे तहसिलदार रणजित भोसले यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकरांची गैरसोय होउ नये म्हणुन शिरुर शहरातील मुस्लिम समाज,जैन युवा परिषद यांच्यावतीने चहा,फराळ,पाणी,वडापाव चे वाटप करण्यात आले.शिरुर शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली होती.शिरुर शहर व परिसरात सकाळपासुन बंद च्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंत केल्याने व स्वयंस्फुर्तीने बंद पाळ्याने शहरातील बंद शभर टक्के शांततेत यशस्वी झाला.बंद दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. इंटरनेट सेवा ही खंडित करण्यात आली होती.त्यामुळे अनेकांचे हाल झाले.
शांततामय मार्गाने पार पडलेल्या  या बंदसाठी शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली  ६ पोलीस अधिकारी,५० कर्मचारी,१ दंगल नियंञण पथक,२७ होमगार्ड असा मोठा कडक बंदोबस्त ठेवन्यात आला होता.

शिरुर तालुक्याच्या पुर्वभागात शुकशुकाट
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बंद दरम्यान गावांमध्ये तसेच रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत होता.
या परिसरातील मांडवगण फराटा, वडगाव रासाई, सादलगाव, शिरसगाव काटा, पिंपळसुटी, इनामगाव, तांदळी, गणेगाव दुमाला, बाभुळसर बुद्रूक, कुरुळी, आंधळगाव तसेच इतर गावांमध्ये बंद पाळण्यात आला. या परिसरातील शाळा तसेच महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते. पूर्व भागातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. दवाखाने व औषधांची दुकाने वगळता इतर कोणतीही दुकाने, हॉटेल्स उघडण्यातच आली नव्हती. पूर्ण दिवस बंद शांततेत पाळण्यात आला.

तळेगाव ढमढेरेत शांततेत बंद

तळेगाव ढमढेरे येथे मराठा आरक्षणासाठी आयोजीत महाराष्ट्र बंद शांततेत पार पडला असून परिसरात बंद पूर्णपणे यशस्वी झाला आहे. आज गुरूवार (दि. ९ ऑगस्ट) रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला व सर्व व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आले होते.तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदमुळे सर्व दुकाने, कार्यालये, व्यापारी गाळे बंद ठेवून कडकडीत आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या समर्थनार्थ सकाळी बाजारपेठेतून व गावातून सर्वपक्षीय कार्यकर्ते, ग्रामस्थ व आंदोलनकर्त्यांनी पेठेतून व गावातून शांततेत मोर्चा काढला. आज दिवसभर बाजारपेठेतील, एसटी स्टॅण्डवरील, बाजार तळावरील शिरूर बाजार समिती उपबाजार आवारातील तसेच तळेगाव ढमढेरे हद्दीतील सर्व दुकाने व गाळे कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. सर्व दुकानदारांनी, व्यापाऱ्यांनी व ग्रामस्थांनी बंदला उत्स्फुर्तपणे पाठिंबा दिल्याने तळेगाव ढमढेरे येथील पेठेतील रहदारीच्या व वर्दळीच्या रस्त्यावर देखील दिवसभर शुकशुकाट होता. एकंदरीत तळेगाव ढमढेरे येथे महाराष्ट्र बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचे चित्र होते.

बंदच्या टॉप घडामोडी :

१)शिरुर तालुक्यातील शाळा,महाविद्यालयांना सुट्टी
२)शिरुर तालुक्यात एस.टी सेवा सकाळपासुन बंद
३)रांजनगाव एमआयडीसी व सणसवाडी एमआयडीसी परिसरात बहुतांश कंपन्या बंद
३)शिरुर तालुक्यात बहुतांश भागात इंटरनेट सेवा ठप्प
४)पुणे-नगर महामार्गावर शुकशुकाट
५) तालुक्यात अनेक गावांनी बंद
६) कोठेही अनुचित प्रकार नाही
७)पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त
८)खासगी वाहतुक पुर्णपणे बंद 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या