रांजणगावमध्ये मुक्तद्वार दर्शनासाठी गर्दी (Video)

रांजणगाव गणपती, ता. 11 सप्टेंबर 2018 (तेजस फडके): अष्टविनायक महागणपती मंदिरात सोमवारपासून (ता. 10) भाद्रपद गणेशोत्सवास उत्साहात सुरवात झाली. पहाटेपासून भाविकांनी मुक्तद्वार दर्शनाचा लाभ घेतला. गुरुवारपर्यंत भाविकांना मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून महागणपतीच्या मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे भाविकांना मुक्तद्वार दर्शनासाठी साखळी पद्धतीच्या रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली 8 पोलिस अधिकारी, 41 पोलिस, 6 महिला पोलिस व 8 होमागार्ड असा मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष दुंडे, उपाध्यक्ष ऍड. विजयराज दरेकर, सचिव प्रा. नारायण पाचुंदकर, खजिनदार शेखर देव, पुजारी व कर्मचाऱ्यांनी भाद्रपद गणेशोत्सवाचे नियोजन केले आहे.
महागणपतीचे 'मुक्तद्वार दर्शन' सोमवारपासून...
रांजणगाव गणपती, ता. 9 सप्टेंबर 2018 (तेजस फडके):  अष्टविनायक महागणपतीचे "मुक्तद्वार दर्शन' सोमवारपासून (ता. 10) गुरुवारपर्यंत (ता. 13) भाविकांना मिळणार आहे. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे भाद्रपद गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष रामा दुंडे यांनी दिली.

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे सोमवार ते बुधवारपर्यंत पहाटे तीन ते सायंकाळी पाचपर्यंत, तर गुरुवारी (ता. 13) रात्री एक ते सायंकाळी सातपर्यंत भाविकांना मुक्तद्वार दर्शन मिळणार आहे. मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून महागणपतीच्या मूर्तीला स्पर्श करून भाविकांना दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. या उत्सवात देवस्थानतर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष रामा दुंडे , उपाध्यक्ष ऍड. विजयराज दरेकर, सचिव प्रा. नारायण पाचुंदकर, खजिनदार शेखर देव, पुजारी, कर्मचारी यांनी उत्सवाची तयारी पूर्ण केली आहे. उत्सवात मंदिर परिसरात रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. उत्सवात ट्रस्टतर्फे सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे, दर्शनासाठी साखळी पद्धतीच्या रांगांची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आदी सुविधांची व्यवस्था करण्यात आली.

प्रथेप्रमाणे भाद्रपद गणेशोत्सवात श्री महागणपतीच्या चारही दिशांना असलेल्या बहिणींना आणण्यासाठी पालखीद्वारे द्वारयात्रा काढण्यात येत आहे. मुस्लिम समाजाने ताशा वाजविल्यानंतर येथील देवाची पालखी द्वारयात्रेसाठी निघते. सोमवारी (ता. 10) सकाळी 11 वाजता पालखी पूर्वद्वार यात्रेसाठी करडे गावाकडे प्रस्थान ठेवणार आहे. मंगळवारी (ता. 11) सकाळी 10 वाजता पालखी दक्षिणद्वार यात्रेकरिता निमगाव म्हाळुंगी गावाकडे प्रस्थान ठेवणार आहे. बुधवारी (ता. 12) सकाळी 10 वाजता पालखीचे पश्‍चिमद्वार यात्रेकरिता गणेगावकडे प्रस्थान होणार आहे. गुरुवारी (ता. 13) दुपारी 12 वाजता पालखी उत्तरद्वार यात्रेकरिता ढोकसांगवी गावाकडे प्रस्थान ठेवणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या