पुण्यात असे कोसळले होर्डिंग; चौघांचा मृत्यू (Video)

Image may contain: one or more people, people walking, crowd, car and outdoor
पुणे, ता. 6 ऑक्टोबर 2018: जुन्या बाजाराजवळील अत्यंत गजबजलेल्या चौकातील (शाहीर अमर शेख चौक) सिग्नलला वाहने थांबलेली असताना अचानक कडाडकड असा आवाज आला अन् काही कळायच्या आत चौघांना मृत्यूने गाठले. शुक्रवारी (ता. 5) दुपारी पावणे दोन वाजता होर्डिंग कोसळले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

आरटीओ कार्यालयाकडून जुन्या बाजाराकडे येणाऱ्या रस्त्यावरील चौकात लाल सिग्नल सुरू होता. त्यामुळे वाहनचालक थांबले होते. त्या वेळी चौकातील रस्त्यालगत रेल्वेच्या जागेतील होर्डिंग अचानक तुटून रिक्षा, दुचाकी आणि मोटारीवर आदळले. त्यात दोघांचा जागीच, तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत चार रिक्षांसह दोन दुचाकी आणि मोटारीचे नुकसान झाले आहे. भीमराव गंगाधर कासार (वय ७०, रा. पिंपळे गुरव), श्‍यामराव धोत्रे (वय ४८, रा. एमडी कॅम्प, देहूरोड), शिवाजी देविदास परदेशी (वय ४०, रा. नाना पेठ), जावेद मिसबाऊद्दीन खान (वय ४९, रा. पिंपरी) अशी मृतांची नावे आहेत. मृतांच्या नातेवाइकांना रेल्वे प्रशासनाने प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.

सिग्नलला थांबल्यानंतर अशा प्रकारचा अपघात होऊ शकतो, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. अपघातानंतरचे दृश्‍य अत्यंत भयानक होते. दहा ते 15 जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. किमान 5-6 रिक्षांचा चक्काचूर झाला, अनेक दुचाकींचेही नुकसान झाले. काही जणांनी तर मृत्यू अक्षरशः फूटभर अंतरावरून पाहिला होता. ज्या होर्डिंगचा सांगाडा कोसळला, त्याचा आकार 40 फूट बाय 40 फूट होता.

होर्डिंगच्या मुद्‌द्‌यावरून रेल्वे प्रशासन व पुणे महापालिका यांच्यात वाद होता. होर्डिंगचा हा सांगाडा काढण्यासाठी पालिकेने मध्य रेल्वेला स्मरणपत्रेही दिली होती. ‘भंगार’ जमा करण्यासाठी गुरुवारी (ता. ५) रात्रीपासून तो सांगाडा पायापासून कापण्यास सुरवात केली होती. अखेर तो सांगाडा कोसळला. बंडगार्डन पोलिसांनी रेल्वे अधिकारी, होर्डिंग काढणारे कामगार आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे.

आईपाठोपाठ वडिलांचा आधार गमावला
रिक्षाचालक शिवाजी परदेशी यांच्या पत्नी प्रीती यांचे केईएम रुग्णालयात गुरुवारी (ता. 4) निधन झाले होते. त्यांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी परदेशी कुटुंबीय आळंदी येथे गेले होते. तेथून शिवाजी आणि कुटुंबीय घरी परतत होते; परंतु रस्त्यात शिवाजी यांच्यावर काळाने घाला घातला. परदेशी यांना समृद्धी आणि समर्थ ही दोन मुले आहेत. त्यांना दोन दिवसांत आईपाठोपाठ वडीलही गमवावे लागले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या