मुलाच्या डोक्यावर केस कमी असल्याने मोडले लग्न?

Image may contain: one or more people
शिक्रापूर, ता. 6 ऑक्टोबरः साखरपुडा झाल्यानंतर मुलाच्या डोक्यावर केस कमी असल्याचे कार पुढे करत वैद्यकीय तपासणी करायला लावली. हे प्रमाणपत्र पाहून नियोजित वधू खवळली अन् अखेर विवाह मोडला. वराच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी नियोजित वधूकडील सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

शिक्रापूर पोलिसांच्या माहितीनुसार, साखरपुडा झाल्यानंतर विवाह मोडल्याचा प्रकार शिरूर तालुक्यात घडला आहे. एका उपवर मुलासाठी महिनाभरापूर्वी एक स्थळ आले होते. मुलगा आणि मुलगी यांनी एकमेकांना पसंती केली होती. यानंतर दोन्ही बाजूंकडून विवाह निश्‍चित करण्यात आला. साखरपुडाही उरकला. वधूसाठी दागिने खरेदी करून कार्यालय निश्‍चित केले. पण अचानक माशी शिंकली अन्‌ नियोजित वधूच्या एका नातेवाइकाला मुलाच्या डोक्‍यावर केस कमी असल्याचा भास झाला. मुलीकडील एका नातेवाइकाने "हे लग्न मोडले' असे समजा, असा निर्णय नियोजित वराच्या पित्याला कळविला. अचानक आलेल्या निरोपामुळे धावपळ उडाली. अखेर, मुलाची वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्रे देण्याचे दोन्ही बाजूंकडून ठरविण्यात आले. त्यानुसार मुलाने एका डॉक्‍टरकडून तपासणी करून घेतली. त्या डॉक्‍टरांनी केसांचा आणि वैवाहिक जीवनाचा कोणताही संबंध नसल्याचे प्रमाणपत्र दिले. मध्यस्थाकडून आलेले हे प्रमाणपत्र पाहून नियोजित वधू भडकली. तिने "हे प्रमाणपत्र विश्वासार्ह नाही' म्हणत आपल्या माहितीतील डॉक्‍टरांकडे मुलाची तपासणी करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे नियोजित वधूने सुचविलेल्या डॉक्‍टरांकडे मुलाची दुसऱ्यांदा वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात आली. याही डॉक्‍टरांनी मुलगा निरोगी असून, त्याच्या केसांचा आणि वैवाहिक जीवनाचा संबंध नसल्याचे प्रमाणपत्र सादर केले. पण, नियोजित वधूचा चुलता आक्रमक झाला आणि त्याने थेट मुलाला दमात घेत "हे लग्न होणार नाही, पुन्हा आम्हाला फोन करू नका, भांडणे होतील,' म्हणून सुनावले.

तब्बल महिना-दीड महिना या घडामोडी सुरू होत्या. अखेर नियोजित वराकडील नातेवाइकांनी नियोजित वधूकडील सहा जणांविरोधात फसवणुकीची तक्रार गुरुवारी (ता.4) दाखल केली. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या