शिक्रापूरमध्ये पोलिसाला 50 हजारांची लाच घेताना पकडले

Image may contain: 1 person, phone
शिक्रापूर, ता. 8 ऑक्टोबर 2018: शिक्रापूर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍याला तब्बल 50 हजार रूपयाची लाच घेताना लाचुलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. शनिवारी (ता. 6) दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस कर्मचार्‍याला 50 हजाराची लाच घेताना पकडण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण पोलिस दलात लाचखोरीचे प्रमाण वाढले असल्याचे लाच लुचपतच्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.

पोलिस हवालदार दत्‍तात्रय विष्णू होले (53, बक्‍कल नं. 829, शिक्रापूर पोलिस स्टेशन) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. त्यांना अटक करण्यात आली असून, शिरूर न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. 8) कोठडी सुनावली आहे. होले हे पुणे ग्रामीण पोलिस दलातील शिक्रापूर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. याप्रकरणी 34 वर्षीय युवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. तक्रारदारास सीआरपीसी 156 (3) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात आरोपी न करता साक्षीदार बनविण्यासाठी पोलिस हवालदार दत्‍तात्रय होले यांनी एक लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार आणि पोलिस हवालदार होले यांच्यामध्ये तडजोड झाली. तडजोडीअंती 50 हजार रूपये लाच घेण्याचे होले यांनी कबुल केले होते.

दरम्यान, तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळ्याचे आयोजन केले होते. होले यांनी पंचासमक्ष शिक्रापूर पोलिस ठाण्यातच तक्रारदाराकडून 50 हजार रुपयाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिस अधिक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक सुहास नाडगौडा, महिला पोलिस निरीक्षक अर्चना दौंडकर, महिला निरीक्षक अनिता हिवरकर आणि त्यांच्या पथकाने कारवाई केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर या करत आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधाः
शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा अथवा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या